अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद़्घाटन करणे, ही राजकीय नेत्यांची मक्तेदारी ?
३ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत वर्धा येथे होत असलेल्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने…
अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद़्घाटन प्रथेप्रमाणे बहुतांश वेळा राजकीय नेत्यांच्या हस्ते होते. ९५ व्या उदगीर येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद़्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते थाटात पार पडले. ‘आतापर्यंतचे एकूण अनुमान बघता शरद पवार यांनी उद़्घाटन केले नाही, तर मराठी साहित्य संमेलन भरतच नाही’, असा समज कदाचित् साहित्य महामंडळाचा असावा; कारण गेल्या १० पैकी ७ संमेलनाची उद़्घाटने शरद पवार यांनी केली आहेत. समोर रसिक असतील कि नाही ? वाचक असतील कि नाही ? आणि मंचावर लेखक असतील कि नाही ? या सगळ्या दुय्यम गोष्टी आहेत; पण तिथे शरद पवार हे उपस्थित असणे आवश्यक आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचा कदाचित् असा ठरावच असावा की, साहित्य संमेलन कुठे घ्यावे ? साहित्य संमेलनाचा अध्यक्ष कोण असावा ? साहित्य संमेलनामध्ये परिसंवाद कसे असावेत ? हे सगळे नंतर ठरवता येईल; परंतु ‘जसे ध्रुवपद अढळ आहे, तसे उद़्घाटनासाठी शरद पवार हे अढळपद आहे. त्यामध्ये पालट करायची काही आवश्यकता नाही’, अशी स्थिती झाली आहे.
१. विधान परिषदेवर साहित्यिकांच्या जागी कार्यकर्त्याची नेमणूक केल्यावरून जाब विचारण्याचे धाडस दाखवणार का ?
जे साहित्यिक ‘देशात कशी असहिष्णुता आहे ? वर्ष २०१४ नंतर वातावरण कसे बिघडले आहे ?’, अशी भाषणे करतात, ते सगळे लेखक आणि सनदी अधिकारी म्हणजे प्रत्यक्ष पदावर असतांना असे कधी बोलले नव्हते. ही सगळ्यात मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. माजी संमेलनाध्यक्ष ‘राजा तू चुकला’, हे भाजपला म्हणजेच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना १०० टक्के म्हणू शकतात; परंतु त्याच मंचावर बाजूला बसलेल्या शरद पवारांकडे बोट दाखवण्याचे त्यांचे धाडस होत नाही.
शरद पवार यांनी विधान परिषदेमध्ये लेखक, कलाकार आणि साहित्यिक यांच्यासाठी असलेल्या जागेवर त्यांच्या पायाशी लाचारीने बसलेलेे साहित्य महामंडळाचे पदाधिकारी आहेत, ‘राजा तू चुकला’, असे म्हणणारे लेखक आहेत; पण यांच्यापैकी कुणालाही आमदारकी दिली नाही. त्याऐवजी पवार यांनी आपल्या कार्यकर्त्या असलेल्या फौजिया खान यांना साहित्यिक, कलावंत कोट्यातून विधान परिषदेवर राज्यपालांकडून नामनिर्देशित करून घेतले. ‘अशा आमदाराला मंत्रीमंडळात स्थान देऊ नये’, अशी एक प्रथा आहे. राज्यपाल किंवा राष्ट्रपती यांनी नेमलेले साहित्यिक, कलावंत, खेळाडू, शास्त्रज्ञ, विचारवंत, अर्थशास्त्रज्ञ असे जे कुणी असतात, त्यांना सल्ला देण्यासाठी नेमलेले असते. त्यामुळे त्यांना मंत्रीमंडळात घेऊ नये, असा संकेत आहे; पण हाही संकेत तोडला गेला. साहित्यिकांच्या जागेवर फौजिया खान यांना घेऊन पुढे त्यांना मंत्रीमंडळात घेतले. हे सर्व घडल्यावर ‘राजा तू चुकला’, हे म्हणण्याचे एकाचेही धाडस झाले नाही.
२. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिलेल्या ग्रंथालयांचा झालेला बट्ट्याबोळ
अखिल भारतीय साहित्य संमलेनामध्ये ग्रंथविक्रीची अवस्था काय असते ? २३ एप्रिल हा ‘जागतिक ग्रंथदिन’ आहे. ग्रंथविक्रीची मराठीमधील काय परिस्थिती आहे ? आणि सार्वजनिक ग्रंथालयांचा जो बट्ट्याबोळ झाला आहे, त्याला राष्ट्रवादी काँग्रेस उत्तरदायी आहे. वर्ष २००७-०८ मध्ये सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या ८ ते ९ सहस्र होती. अचानक ही ग्रंथालये वाढली. राष्ट्रवादीने जाणीवपूर्वक ‘क’ आणि ‘ड’ वर्गाची ग्रंथालये वाढवली. ‘ड’ वर्गाच्या ग्रंथालयांना अधिक मान्यता देण्यासाठी आपल्याच कार्यकर्त्यांकडून प्रस्ताव प्रविष्ट करून घेतले. आता ती संख्या १२ सहस्रांहून अधिक आहे. महाराष्ट्रातील ‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ अशी जी सार्वजनिक ग्रंथालये आहेत, त्यापैकी ‘ड’ वर्गाची संख्या अचानक वाढली. त्या वेळी अर्थमंत्री अजित पवार होते. राष्ट्रवादीच्या ज्या कार्यकर्त्यांना ही ग्रंथालये मिळाली, त्यातील बहुतांश ग्रंथालयांचे वाटोळे झाले आहे. त्या संदर्भात यातील एकाही साहित्यिकाचे ‘राजा तू चुकला’, हे म्हणण्याचे धाडस नाही.
३. मराठी भाषिक साहित्यिकांमध्ये शासनकर्त्यांविरुद्ध आवाज उठवणार्यांची संख्या पुष्कळ अल्प
काही साहित्यिक सत्तेचा उपभोग घेतात किंवा नोकरीमध्ये असतांना काही बोलत नाहीत. नोकरी संपून निवृत्तीनंतर मात्र हे म्हणतात, ‘‘राजा तू चुकला.’’ सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना म्हणायचे त्यांचे धाडस नाही; पण पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना मात्र तसे सांगतात. आणीबाणीमध्ये अभिव्यक्तीस्वातंत्र्यासाठी देशभरामधून शेकडो लोक कारागृहात गेले. त्या वेळी महाराष्ट्रामध्ये अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा एकूणच गळा घोटला होता, त्या काळात शरद पवार कुठे होते ? ते काँग्रेसमध्येे आणि प्रत्यक्ष मंत्रीमंडळात होते. आणीबाणीमध्ये साहित्यिकांपैकी दुर्गा भागवत, अनंत भालेराव, नरहर कुरूंदकर आणि विनय हर्डीकर यांनी आंदोलन केले. यांपैकी अनंत भालेराव आणि विनय हर्डीकर या दोघांना कारावास भोगावा लागला. पाचवा कुणीही माणूस कारागृहात गेला नाही. त्या वेळी एकही साहित्यिक ‘राजा तू चुकला’, असे म्हणाला नाही. यांचे ‘राजा तू चुकला’, हे ढोंग केवळ स्वतःची पदे आणि नोकरी सगळे व्यवस्थित झाल्यावर आहे.
४. पंतप्रधान मोदींवर टीका करणारे आणि त्यांच्याच हस्ते पुरस्कार स्वीकारणारे साहित्यिक
‘मोदी सरकारच्या काळात देशात असहिष्णुतेचे वातावरण आहे’, असे म्हणत ‘पुरस्कार वापसी’ झाली; पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुरस्कार मिळावे; म्हणून साहित्यिकांनीच अर्ज केले होते. महाराष्ट्र शासनाचे जे पुरस्कार आहेत, त्या पुरस्कारासाठी आपणहून अर्ज करावा लागतो. अर्ज केलेला पुरस्कार परत करण्यामध्ये नेमकी कोणती नैतिकता होती ? काही जणांविषयी त्यांनी पुरस्कार परत केल्यावरच कळले की, त्यांना पुरस्कार दिला गेला होता. ‘देशात असहिष्णु वातावरण आहे’, असे म्हणणारे आणि‘ पुरस्कार वापसी’चे समर्थन करणारे जे कुणी मराठी लेखक आहेत, त्यांपैकी एकानेही त्याला मिळालेला साहित्य अकादमीचा पुरस्कार परत केला नाही. फक्त ‘राजा तू चुकला’, असे म्हणत राहिले. ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ हा एका खासगी संस्थेचा आहे. त्याचा शासनाशी काहीही संबंध नाही. हा पुरस्कार जे स्वतः कायम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने खडे फोडत होते, त्या भालचंद्र नेमाडे यांनी त्यांच्याच हस्ते स्वीकारला. टीका करणारे हे लोक सरकारी नसलेला ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ स्वीकारतात.
५. राजकारण्यांना प्राधान्य दिल्याने ढासळलेली महाराष्ट्रातील ग्रंथ चळवळ
जागतिक ग्रंथदिनाच्या निमित्ताने मराठी ग्रंथांची जी परिस्थिती आहे, त्याविषयी हे साहित्यिक ‘चकार’ बोलत नाहीत. तुमच्यापैकी आज जे साहित्य संमेलनामध्ये उपस्थित असतील, त्यांनी तुमच्या आवडीचे कुठलेही आणि कुठल्याही दुकानातील पुस्तक काढून बघावे. त्यावरची प्रकाशनाचा दिनांक काय आहे ? आणि किती वर्षांमध्ये त्या पुस्तकाच्या किती आवृत्त्या संपल्या आहेत ? ते बघावे. आज महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या १२ सहस्रांहून अधिक आहे. शाळा आणि महाविद्यालये येथील ग्रंथालये धरली, तर ही संख्या २५ ते ३० सहस्रांपर्यंत जाते. यातील किमान १० सहस्र ग्रंथालये चांगली नोंद घेण्यासारखी आहेत. या ग्रंथालयातील तुमच्या आवडीच्या पुस्तकाच्या १० सहस्रांहून अधिक प्रती खपल्या तर सांगा. ग्रंथालय चळवळीचे महाराष्ट्रात वाटोळे झाले आहे. साहित्य संमलेनामध्ये अभिनेते-अभिनेत्री, राजकीय नेते हवे असतात, मोठा मंडप हवा असतो, ट्रॉलीवरच्या कॅमेर्याने चित्रीकरण लागते; पण आताही तुम्ही मराठी साहित्याचे जे सत्त्व आहे, ते कारण नसतांना शासनकर्त्यांच्या पायावर लाचारीने ठेवले आहे.
(साभार : सामाजिक संकेतस्थळ)