महाशिवरात्रीच्या निमित्ताने मिरज येथे कीर्तन महोत्सव, तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन ! – माधवराव गाडगीळ
मिरज, २ फेब्रुवारी (वार्ता.) – समर्थभक्त गाडगीळ मित्र परिवार, काशीविश्वेश्वर ट्रस्ट यांच्या वतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने काशी विश्वेश्वर देवालय येथे १४ ते १७ फेब्रुवारीपर्यंत कीर्तन महोत्सव, तसेच विविध कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम काशीविश्वेश्वर मंदिराच्या पटांगणात होत आहे, अशी माहिती संयोजक श्री. माधवराव गाडगीळ यांनी दिली.
१. समर्थभक्त गाडगीळ मित्र परिवाराच्या वतीने प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीनिमित्त कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा महोत्सवाचे २१ वे वर्ष आहे. आजवर अनेक प्रसिद्ध कीर्तनकारांनी त्यांच्या सुश्राव्य कीर्तनाची सेवा शंभू महादेवाच्या चरणी अर्पण केली आहे.
२. यंदा ह.भ.प. कु. अमृता करंबळेकर (गोवा) आणि ह.भ.प. राजेंद्रबुवा मांडेवाल यांचा कीर्तन कार्यक्रम होणार आहे. १४ फेब्रुवारीला गुरुकृपा भजनी मंडळाचे भजन, अमृता करंबळेकर यांचे कीर्तन, १५ फेब्रुवारीला अंबाबाई भजनी मंडळाचे भजन, अमृता करंबळेकर यांचे कीर्तन आहे. १६ फेब्रुवारीला वेणास्वामी भजनी मंडळ आणि गुरुकृपा भजनी मंडळाचे भजन, रात्री ७ वाजता राजेंद्रबुवा मांडेवाल (मुंबई) यांचे कीर्तन होणार आहे.
३. १७ फेब्रुवारीला पहाटे ५ ते सायंकाळी ६ पर्यंत १३ घंटे अखंड ‘श्रीराम जयराम जय जय राम’ नामस्मरण होणार आहे. १८ फेब्रुवारी हा महोत्सवाचा शेवटचा दिवस असून पहाटे ५ वाजता उद्योजक श्री. किशोर पटवर्धन यांच्या हस्ते लघु रुद्राभिषेक होणार आहे.
४. उत्सवकाळात प्रतिदिन शिवलीलामृत पारायण होणार आहे. विनामूल्य आरोग्य पडताळणी शिबिर आणि सायंकाळी व्याख्यान, तसेच गायन कार्यक्रमानंतर महोत्सवाची सांगता होणार आहे.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने १८ फेब्रुवारीला सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन लावण्यात येणार आहे, त्याचाही भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. |