पुणे शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी १५ मार्गांचे सर्वेक्षण !
पुणे – शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गुंतागुंतीची होत आहे. ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी शहरातील १५ गर्दीच्या मार्गांवर वाहतूक पोलीस, महापालिका, मेट्रो, ‘स्मार्ट सिटी’चे अधिकारी, पी.एम्.पी.एम्.एल्. कडून पहाणी करण्यात येणार आहे. पहाणीनंतर या मार्गांवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. या संदर्भात नुकतीच पोलीस आयुक्तालयामध्ये बैठक घेण्यात आली. प्रतिवर्षी शहरातील वाहनांची संख्या वाढत आहे. या संख्येमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. काही मार्गांवर ‘मेट्रो’चे काम चालू आहे. अनेक भागांतील रस्त्यावर अतिक्रमण झाल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होण्याचे प्रमाण वाढत आहे, असे निरीक्षण बैठकीत मांडले आहे.
पोलीस आयुक्त रितेश कुमार म्हणाले की, शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलीस, महापालिका, मेट्रो आणि इतर सामाजिक संस्थांतील प्रतिनिधी असे एकत्रित काम करणार आहेत. त्यासाठी सर्वसमावेशक समिती सिद्ध केली जाणार आहे. या समितीशी संवाद साधत टप्प्याटप्प्याने उपाययोजना करण्यात येतील. प्रारंभी १५ मार्गांची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर अन्य मार्गांची पहाणी करून वाहतूक सुधारण्याकरता प्रयत्न करू.