पंढरपुरात माघ वारीत उपवासाचे पदार्थ खाल्ल्याने विषबाधा !
१३७ भाविक रुग्णालयात दाखल
पंढरपूर – नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांतून अनेक भाविक माघी यात्रेसाठी पंढरपूर येथे आले होते. त्यांची मनाठा-पंढरपूर दिंडी गेल्या २५ वर्षांपासून पंढरीत येते. हे भाविक संत निळोबा सेवा मंडळ मठात मुक्कामी होते. एकादशीला म्हणजेच
१ फेब्रुवारी या दिवशी त्यांनी भगर आणि आमटी खाल्ली. त्यांना दुसर्या दिवशी पहाटे मळमळ, उलट्या आणि चक्कर यांचा त्रास चालू झाला. बाधीत झालेल्या १३७ जणांना पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्या सर्वांवर प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. ही माहिती मिळताच अन्न आणि औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कूचेकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पंढरपूर शहरातील मर्दा या दुकानातून जेवण बनवण्याचे साहित्य आणले असल्याची माहिती समोर आली आहे.