साधकांनो, स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनाची प्रक्रिया प्रामाणिकपणे राबवून अन् गुर्वाज्ञापालन करून गुरुकृपा ग्रहण करूया !

‘एकदा एका जिज्ञासूने प.पू. डॉक्‍टरांना प्रश्‍न विचारला, ‘‘साधना करतांना कुंडलिनीचा प्रवास कसा असतो ?’’ तेव्‍हा प.पू. डॉक्‍टरांनी सांगितले, ‘‘अन्‍य कोणत्‍याही मार्गाने साधना केली, तर कुंडलिनीचा प्रवास अधिकाधिक मणिपूरचक्रापर्यंत होतो; मात्र गुरुकृपायोगानुसार साधना करत असतांना कुंडलिनीचा प्रवास आज्ञाचक्रापासून चालू होतो.’’ तेव्‍हा त्‍यावर माझे पुढीलप्रमाणे चिंतन झाले.

पू. अशोक पात्रीकर

१. व्‍यक्‍ती साधना करू लागल्‍यावर तिच्‍या कुंडलिनीचा प्रवास मूलाधारचक्र ते सहस्रारचक्र असा होत असणेे

मनुष्‍यदेहात मूलाधार, स्‍वाधिष्‍ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्रार अशी सप्‍तचक्रे आहेत. व्‍यक्‍ती साधना करू लागली की, मूलाधारचक्रावर असणार्‍या कुंडलिनीचा सहस्रारचक्राकडे जाण्‍याचा प्रवास चालू होतो. जशी साधना वाढत जाईल, तशी कुंडलिनीची गती वाढते आणि एकेका चक्राला भेदून ती पुढे जाते.

२. अन्‍य संप्रदायांमध्‍ये साधकांना स्‍वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्‍यास न शिकवल्‍यामुळे त्‍यांच्‍या कुंडलिनीचा प्रवास केवळ मणिपूर चक्रापर्यंत होणे

‘अन्‍य संप्रदायानुसार साधना केली, तर कुंडलिनी मणिपूर चक्रापर्यंत वर येतेे’, असे प.पू. डॉक्‍टरांनी सांगितले. याचा अर्थ कुंडलिनी मणिपूरचक्रापर्यंत आल्‍यावर त्‍यांची साधना अपूर्ण रहाते; कारण ‘साधनेतील मुख्‍य अडथळा असलेले स्‍वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन कसे करायचे ?’, हे अन्‍य संप्रदायात शिकवले जात नाही. ‘दशापराधविरहित परिपूर्ण साधना केली, तरच मोक्षप्राप्‍ती होणार आहे’, ही प.पू. डॉक्‍टरांची शिकवण आहे.

३. गुरुकृपायोगानुसार साधना करतांना प.पू. डॉक्‍टरांनी आपल्‍याला स्‍वभावदोष आणि अहं यांचा अडथळा दूर करण्‍याचा प्रभावी उपाय सांगितला आहे आणि ‘ही प्रक्रिया साधकांकडून प्रभावीपणे राबवली जात आहे ना ?’, याचाही आढावा घेण्‍याची कार्यपद्धत चालू केली आहे.

४. प.पू. डॉक्‍टर मोक्षगुरु असल्‍याने साधकांनी गुर्वाज्ञापालन केल्‍यास त्‍यांचे सहस्रारचक्र उघडून त्‍यांचा साधनाप्रवास मोक्षाकडे होत असणे

गुरुकृपायोगानुसार साधनेत कुंडलिनीचा प्रवास आज्ञाचक्रापासून आरंभ होतो. या ठिकाणी असलेली कुंडलिनी सतत जागृत ठेवण्‍यासाठी आज्ञापालन करणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे, म्‍हणजेच साधकांनी आज्ञापालन करत राहिल्‍यास त्‍यांचे सहस्रारचक्र जागृत होऊन आणि ईश्‍वरी चैतन्‍य त्‍यांच्‍या देहात येऊन त्‍यांच्‍या देहाची शुद्धी होत राहील. आपण जेवढे आज्ञापालन करू, तेवढे सहस्रारचक्र उघडते आणि साधकांचा मोक्षाकडे प्रवास होत रहातोे. यातूनच ‘प.पू. डॉक्‍टर हे मोक्षगुरुच आहेत’, हे लक्षात येते.

५. गुरु, संत आणि दायित्‍व असलेले साधक यांचे आज्ञापालन करून गुरुकृपा ग्रहण करणे आवश्‍यक असणे

साधकांनी गुरूंचे  आज्ञापालन करायचे आहे. प.पू. डॉक्‍टर आपल्‍याला गुरुस्‍थानी आहेत; पण ते साधकांना थेट व्‍यष्‍टी किंंवा समष्‍टीच्‍या सेवा देत नाहीत, तर दायित्‍व असलेले साधक साधकांना सेवा देतात; मात्र प्रत्‍येक सेवेसाठी प.पू. डॉक्‍टरांचा संकल्‍प झालेला असतो. या उदाहरणातून शिकून आपण सर्वांनी गुरूंचे आज्ञापालन करून गुरुकृपा ग्रहण करूया.

(प्रश्‍न : प.पू. डॉक्‍टर, हे चिंतन योग्‍य कि अयोग्‍य आहे, याविषयी आपले अमूल्‍य मार्गदर्शन मिळावे, अशी आपल्‍या चरणी प्रार्थना आहे.- योग्‍य आहे.)

‘जिज्ञासूला दिलेल्‍या उत्तराच्‍या माध्‍यमातून प.पू. डॉक्‍टरांनी ‘आज्ञापालनाचे महत्त्व’ आणि ‘प्रत्‍येकामध्‍ये गुरुरूप पहाणे’, याचे महत्त्व साधकांच्‍या मनावर बिंबवलेे आहे’, असे मला शिकायला मिळाले. गुरुमाऊलींनी सुचवलेली ही शब्‍दसुमने त्‍यांच्‍या चरणांवर कृतज्ञताभावाने समर्पित करतो.’

– गुरुसेवक,

(पू.) अशोक पात्रीकर, अमरावती (२६.१२.२०२२)