भारत ‘हिंदु राष्ट्र’ आहे !
रा.स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांची स्पष्टोक्ती !
जयपूर (राजस्थान) – भारत हे हिंदु राष्ट्र आहे; कारण ज्यांनी हा देश घडवला ते हिंदु आहेत. भारतात रहाणारे सर्व लोक हिंदु आहेत; कारण त्यांचे पूर्वज हिंदु होते. त्यांच्या उपासनेची पद्धत वेगळी असू शकते; परंतु त्या सर्वांचा डीएन्ए (गुणसूत्र) एकच आहे, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी येथील बिर्ला सभागृहात दीनदयाळ स्मृती व्याख्यानमालेत केले. ते ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : काल, आज आणि उद्या’ या विषयावर बोलत होते.
संघ सरकार्यवाह दत्तात्रेय होसबोले ने कहा-गौ मांस खाने वालों की घर वापसी हो सकती है, जिन्हें हम हिंदू कहते हैं, वो हिंदू हैं https://t.co/GGwHH2eheT pic.twitter.com/on6WgWCrx9
— Goverdhan Chaudhary (@Goverdhan__) February 2, 2023
सरकार्यवाह होसबळे यांनी मांडलेली सूत्रे
१. काही लोक म्हणतात की, वेद आणि पुराण यांत हिंदु शब्द नाही; पण वेद आणि पुराण यांत असे काहीही नाही की, ते मान्य केले जाऊ नये. सत्य आणि उपयुक्त गोष्टींचा स्वीकार केला पाहिजे.
२. डॉ. हेडगेवार ‘हिंदु कोण ?’ या व्याख्येत पडले नाहीत. जे भारतभूमीला पितृभूमी मानतात, ते हिंदु आहेत, ज्यांचे पूर्वज हिंदु आहेत, ते लोक हिंदु आहेत. जो स्वतःला हिंदु समजतो, तो हिंदु आहे. ज्यांना आपण हिंदु म्हणतो, ते हिंदु आहेत.
३. भारतातील ६०० हून अधिक जमाती म्हणायच्या, ‘‘आम्ही वेगळे आहोत. आम्ही हिंदू नाही.’’ त्यांना चिथावणी देण्याचे काम भारतविरोधी शक्तींनी केले होते. त्यावर पू. गोळवलकरगुरुजी म्हणाले होते, ‘‘ते हिंदु आहेत.’’
४. आम्ही ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ (अर्थ : संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे.) या संकल्पनेवर काम करत असल्याने त्यांच्यासाठी दरवाजे बंद नाहीत. कुणी नाईलाजाने गोमांस खाल्ले असेल आणि काही कारणाने ते बाहेर पडलेले असतील; पण त्यांच्यासाठी आम्ही आमचे दार बंद करू शकत नाही. आजही त्यांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश होऊ शकतो.
५. आज संघ राष्ट्रीय जीवनाच्या केंद्रस्थानी आहे. संघ व्यक्ती आणि समाज निर्माणाचे काम करत राहील. समाजातील लोकांना जोडून समाजासाठी काम करणार आहे. आज संघाची एक लाख ठिकाणी सेवा कार्ये चालू आहेत. देशात संघाचे शेकडो लोक मारले गेले; पण कार्यकर्ते घाबरलेले नाहीत. संघ केवळ राष्ट्रहितासाठी काम करणार आहे आणि आम्ही राष्ट्रवादी आहोत.