आयुर्वेद, योग, कीर्तन, नैसर्गिक शेती यांची कास धरणे आवश्यक ! – श्री श्री रविशंकरजी
कोल्हापूर, १ फेब्रुवारी (वार्ता.) – भारत प्रत्येक गोष्टीत पूर्वीपासून समृद्ध आहे. कोरोना महामारीच्या काळात आयुर्वेद, तसेच अन्य पद्धतींनी ते सिद्ध केले आहे. भोजनापासून भारतियांची प्रत्येक कृती आदर्श अशीच आहे; मात्र आपल्याकडे असलेल्या महान वारशाकडे आपण लक्ष देत नाही. यापुढील काळात आयुर्वेद, योग, भजन, कीर्तन, नैसर्गिक शेती यांची कास धरणे आवश्यक आहे. प्रत्येकाने समाजसेवेसाठी काही वेळ देणे आवश्यक आहे, असे आवाहन ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते श्री श्री रविशंकरजी यांनी केले. ते तपोवन येथे झालेल्या महासत्संगात बोलत होते.
१ फेब्रुवारी या दिवशी श्री श्री रविशंकरजी यांनी सकाळी श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले. या प्रसंगी श्री श्री रविशंकरजी यांनी देवीच्या उत्सवमूर्तीला अभिषेक केला. या वेळी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे कोल्हापूर येथील प्रतिनिधी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव श्री. शिवराज नाईकवाडे, श्रीपूजक श्री. केदार मुनीश्वर, तसेच अन्य उपस्थित होते.