राष्ट्रगुरु श्रीसमर्थ रामदासस्वामी यांच्या पादुकांचे सातारानगरीत उत्साहात स्वागत !
सातारा, १ फेब्रुवारी (वार्ता.) – दासनवमीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रगुरु श्रीसमर्थ रामदासस्वामी यांच्या पादुका दौर्यासाठी निघतात. दौरा संपवून या पादुकांचे नुकतेच सातारा नगरीत आगमन झाले. रामदासस्वामी संस्थान, सज्जनगड येथील पादुका शहरातील काळाराम मंदिर येथे, तर श्रीसमर्थ सेवा मंडळ, सज्जनगड येथील पादुका समर्थ सदन येथे मुक्कामी होत्या. शहरातून मिरवणूक काढून त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
स्वागत समारंभ आणि मिरवणुकीसाठी समर्थभक्त, समाजातील अनेक प्रतिष्ठित आणि मान्यवर उपस्थित होते. या वेळी समर्थ संप्रदायासह वारकरी संप्रदायातील भक्तमंडळीही उपस्थित होती. समर्थभक्त टाळ, मृदंग, शिंग, तुतार्या यांच्या निनादात भजने म्हणत भक्तीरसात न्हाऊन निघाले.