दिवा येथील क्षेपणभूमी बंद !
क्षेपणभूमीला नागरिकांचा विरोध
ठाणे, १ फेब्रुवारी (वार्ता.) – ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात प्रतिदिन १ सहस्र ५० टन कचरा निर्माण होतो. त्यापैकी १२५ टन कचर्यावर विविध प्रकल्पांतर्गत शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून त्यापासून खतनिर्मिती केली जाते. उर्वरित सुमारे ६०० टन ओला कचरा दिवा क्षेपणभूमीवर टाकला जात होता. कचर्याला आग लागणे आणि परिसरात दुर्गंधी पसरणे यांमुळे या क्षेपणभूमीला दिवा येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला होता.
डायघर घनकचरा प्रकल्प उभारणीचे काम पूर्ण होईपर्यंत महानगरपालिकेच्या क्षेत्राबाहेर म्हणजेच भंडार्ली येथे तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेला कचरा प्रकल्प प्रशासनाने कार्यान्वित केला आहे. यामुळे दिवा क्षेपणभूमी बंद झाल्याने येथील नागरिकांची कचरा समस्येतून सुटका झाली आहे, तसेच डायघर घनकचरा प्रकल्प येत्या २ ते ३ मासांमध्ये कार्यान्वित होणार असून यानंतर भंडार्ली प्रकल्प बंद करण्यात येणार असल्याचा दावा महानगरपालिका प्रशासनाने केला आहे.