शेलुद (जिल्हा संभाजीनगर) येथील निवडणुकीत संपूर्ण ग्रामपंचायतच विकली !
लिलावातून मिळाले २८ लाख रुपये !
संभाजीनगर – जिल्ह्यातील शेलुद ग्रामपंचायतीत धक्कादायक प्रकार समोर आला असून ग्रामपंचायतीचा लिलाव करण्यात आला आहे, असा आरोप गावकर्यांनी केला आहे. ग्रामपंचायतीमधील सदस्यांपासून थेट सरपंचपदासाठी एकूण २८ लाख ५६ सहस्र रुपयांची बोली लावण्यात आली होती. गावाच्या मंदिरासमोर ग्रामसभा बोलावून हा लिलाव ठेवण्यात आला आहे, असा आरोप गावकर्यांनी केला आहे, तर या लिलावाचा कथित व्हिडिओही प्रसारित झाला आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीचा लिलाव झाल्यावर ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याचे शासकीय कागदोपत्री दाखवण्यात आले आहे.
(सौजन्य : Moral Maharashtra)
राज्यात नुकत्याच ७ सहस्रांहून अधिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. त्यात संभाजीनगर जिल्ह्यात २१६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या; मात्र याच वेळी काही ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाल्याचे पहायला मिळाले होते. यामध्ये शेलुद ग्रामपंचायतही होती. सदस्य पदासाठी ७० सहस्रांपासून २ लाख रुपयांपर्यंतची बोली लागली होती, तसेच सरपंचपद १४ लाख ५० सहस्र रुपयांत आणि उपसरपंचपद ४ लाख रुपयांना विकल्याचा दावा करण्यात आला आहे. राजू म्हस्के हे ४ लाख रुपये भरून उपसरपंच झाले होते; मात्र लिलाव न पटल्यामुळे त्यांनी त्यागपत्र देऊन हा सर्व प्रकार उघडकीस आणला आहे.