आधुनिक वैद्यांवरील आक्रमणांत १३ वर्षांत केवळ दोघांनाच शिक्षा !
कायद्यातील पळवाटांचा घेतला जातो अपलाभ !
संभाजीनगर – राज्यात आधुनिक वैद्यांवरील आक्रमणांचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. मागील दीड मासात आधुनिक वैद्यांवर जीवघेणे आक्रमण झाल्याच्या ५-६ घटना घडल्या आहेत. यामुळे आधुनिक वैद्यांमध्ये भीतीचे वातावरण असून कायद्यातील पळवाटांचा समाजविघातक लोकांना लाभ पोचत आहे, अशी खंत ‘आय.एम्.ए.’चे राज्य अध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे यांंनी व्यक्त केली. गेल्या १३ वर्षांत आधुनिक वैद्यांवर झालेल्या आक्रमण प्रकरणांत केवळ २ जणांनाच शिक्षा झाल्याची माहिती ‘आय.एम्.ए.’च्या वतीने देण्यात आली.
‘महाराष्ट्र इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या वतीने ३० जानेवारी या दिवशी येथील आय.एम्.ए. सभागृहात आधुनिक वैद्यांचा एकदिवसीय परिसंवाद पार पडला. या वेळी आय.एम्.ए. संभाजीनगरचे अध्यक्ष डॉ. सचिन फडणीस, माजी अध्यक्ष डॉ. संतोष रंजलकर, सचिव डॉ. उज्ज्वला दहिफळे यांची उपस्थिती होती.
आधुनिक वैद्य रवींद्र कुटे म्हणाले, ‘डॉक्टर रुग्णांना सर्वोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करतात. गाव किंवा तालुका पातळीवर रुग्णांचा महत्त्वाचा वेळ जाऊ नये म्हणून अनेकदा जोखीम घेतात; मात्र रुग्ण बरा झाला तर कुणी नाव घेत नाही, याउलट काही वाईट झाले, तर आधुनिक वैद्यांनी दुर्लक्ष केले असा अपप्रचार केला जातो. अनेकदा रुग्ण किंवा मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांचे काही म्हणणे नसते; मात्र त्यांचे नातेवाईक आणि समाजातील इतर लोक आधुनिक वैद्यांवर धावून जातात. हे योग्य नाही. अशा प्रकरणांत कारवाई झालीच पाहिजे.’
‘आय.एम्.ए.’चे महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ. भोडवे म्हणाले, ‘गेल्या १३ वर्षांत १५० हून अधिक आधुनिक वैद्यांवर झालेल्या आक्रमण प्रकरणांत केवळ नाशिक आणि वसई येथील प्रकरणांत शिक्षा झाली आहे. या प्रकरणांत कारवाई होत नसल्यामुळे आक्रमणकर्त्यांना भीतीच राहिलेली नाही.’ ‘आधुनिक वैद्य हा समाजाचा महत्त्वाचा घटक असून त्यांनी समाजाची सेवा करण्यासाठी कायम तत्पर राहिले पाहिजे. आपण त्याविषयी दायित्व स्वीकारले पाहिजे’, असे मत आधुनिक वैद्य संतोष रंजलकर यांनी व्यक्त केले.