‘जय जय महाराष्ट्र माझा’ गीताला महाराष्ट्राच्या राज्यगीताचा दर्जा !
मुंबई – ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताला महाराष्ट्र शासनाने राज्यगीताचा दर्जा दिला आहे. १९ फेब्रुवारीपासून ‘राज्यगीत’ म्हणून या गीताचा स्वीकार करण्यात येणार आहे. ३१ जानेवारी या दिवशी मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रीमंडळाची बैठक पार पडली.
‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताचे गीतकार राजा बढे, गायक शाहीर साबळे, तर संगीतकार श्रीनिवास खळे हे आहेत. मागील अनेक दशकांपासून अवघ्या महाराष्ट्राचे प्रेरणागीत आणि स्फूर्तीगीत अशी या गीताची ओळख आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक राज्याचे एक गीत असावे, असे केंद्र सरकारने राज्यांना सुचवले आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील ३ गीतांची निवड झाली होती. त्यापैकी ‘गर्जा महाराष्ट्र’ या गीताची राज्यगीत म्हणून निवड करण्यात आली आहे.
‘जन-गण-मन’ नंतर होणार जय जय महाराष्ट्र गीत ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्रीमहाराष्ट्रात राष्ट्रगीतानंतर राज्यात ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत गाण्यात येईल. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमातही हे राज्यगीत म्हटले जावे. विधानभवनातही ‘वंदे मातरम्’ नंतर राज्यगीत म्हणावे, अशी यासाठी आम्ही विनंती करणार आहोत. |