डॉक्टर, माझी मासिक पाळी आलीच नाही अजून !
मासिक पाळी आली नाही ? किंवा आली, म्हणजे गर्भधारणा झाली नाही. या दोन सूत्रांभोवती आम्हा स्त्रीरोगतज्ञांची ‘ओपीडी’ (बाह्य रुग्ण विभाग) कायम फिरत असते. या दोन्ही प्रश्नांची उत्तरे स्त्रियांच्या मनःस्तापाला कारणीभूत ठरू शकतात. स्त्रीचे शरीर आणि मन हे पूर्णपणे ‘हॉर्मोन्स’च्या (संप्रेरकाच्या) तालावर नाचत असते. त्यामुळे पाळी वेळेवर येणे, ही प्रक्रिया शारीरिक आणि मानसिक संतुलन यांसाठी अत्यंत आवश्यक आहे.
१. पाळी न येण्याची कारणे आणि उपाय
आधी आपण पाळी न येण्याविषयी बघूया. मुली वयात यायला लागल्या की, त्यांच्या शरिरात विविध पालट घडू लागतात आणि मग पाळी चालू होते. एखाद्या मुलीची पाळी १५ व्या वर्षापर्यंत चालू न झाल्यास ते ‘असाधारण’ समजले जाते. अशा वेळी संबंधित मुलीच्या सगळ्या चाचण्या करून पाळी चालू न होण्याची कारणे शोधणे आवश्यक ठरते.
पाळी चालू न होण्यामागे जनन संस्थेतील काही जन्मजात व्यंग कारणीभूत असू शकते. काही वेळा काही जनुकीय समस्याही असू शकतात. यातील काही समस्यांना वैद्यकीय उपचार उपलब्ध असतात, तर काही समस्यांच्या संदर्भात विशेष असे काही करता येत नाही.
योनीमार्गाचे तोंड (योनीपटल) पूर्णपणे बंद असणे, ही एक समस्या असू शकते. अशा मुलींना पाळी चालू झालेली लक्षातच येत नाही; पण मासातून काही दिवस पोट अतिशय दुखते. ‘सोनोग्राफी’ आणि योनीमार्गाची तपासणी केल्यावर ही समस्या लगेच लक्षात येऊ शकते. मग भूल देऊन योनीमार्गाच्या मुखाशी छोटा छेद दिला जातो. त्यामुळे आतमध्ये साठलेले रक्त निघून जाऊन या मुलींची जननसंस्था पुन्हा एकदा पूर्ववत् होऊ शकते; मात्र याचे निदान वेळेवर होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
२. पाळी चालू न होण्यामध्ये ‘टर्नर सिंड्रोम’ आणि ‘हॉर्मोन्स’ यांचे महत्त्व !
कोणताही जीव जन्माला येतांना निसर्गाचे फासे चुकीचे पडले, तर विविध जनुकीय व्यंगे निर्माण होऊ शकतात. ‘टर्नर सिंड्रोम’ हा असाच एक प्रकार आहे. स्त्रियांच्या जनुकीय रचनेमध्ये ‘XX’ अशी दोन गुणसूत्रे असतात; पण ‘टर्नर सिंड्रोम’ असलेल्या स्त्रियांमध्ये एकच X गुणसूत्र असते. त्यामुळे त्यांची शारीरिक वाढ योग्य होत नाही. तसेच ‘हॉर्मोन्स’चे प्रमाण अल्प असल्यामुळे पाळी चालू होण्यास पुष्कळ विलंब होणे किंवा चालूच न होणे, अशी लक्षणे दिसतात. या मुलींची उंची पुष्कळ अल्प, आखूड रुंद मान, खालच्या बाजूला असलेले कान, रुंद छाती, कोपरापासून थोडे बाहेर वळणारे हात, टाळूचा वेगळा आकार, बारीक अन् बाहेर वळलेली नखे इत्यादी लक्षणे दिसून येतात. वेळेवर निदान झाल्यास या मुलींना योग्य ‘हॉर्मोन्स’चे डोस देऊन पाळी चालू करता येते. अशा मुलींना वंध्यत्वाची शक्यता अधिक असते; पण काही वेळा आधुनिक वैद्यकीय उपचारांनी त्यांना मातृत्वाचाही लाभ होऊ शकतो.
३. पाळी अनियमित असल्यास वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक !
पाळी चालू झाल्यानंतर काही वर्षे ती अनियमित असणे स्वाभाविक आहे; पण पाळी वेळेवर येत नसेल आणि मुलीचे वजन वाढत चालले असेल, तर स्त्रीरोगतज्ञांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. ही ‘पीसीओडी’चा (‘पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसिज’चा) प्रारंभ असू शकतो. तसेच पाळी बंद होण्याची वेळ जवळ आली की, ती पुढे पुढे जाऊ लागते आणि रक्तस्राव न्यून होऊ लागतो. ‘मोनोपॉज’च्या काळात रक्तस्राव अधिक दिवस किंवा अधिक प्रमाणात होणे, ही साधारण गोष्ट नाही. यासाठी त्वरित स्त्रीरोगतज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
स्त्रियांमध्ये पाळी लांबली, तर पहिले कारण अर्थातच गर्भारपण हेच असते; पण पालटत्या जीवनशैलीमुळे विविध कारणांमुळे पाळीच्या समस्या उद़्भवत आहेत. कधीतरी एखाद्या मासात पुष्कळ मानसिक ताण आला, तरी पाळी पुढे जाऊ शकते; मात्र वारंवार असे होणे योग्य नाही. स्त्रीबीज निर्माण होण्याची प्रक्रिया ही प्रत्येक मासिक पाळीच्या चक्रात अंतर्भूत असते. त्यामुळे एखाद्या मासात स्त्रीबीज निर्माण झाले नाही, तर पाळी पुढे जाऊ शकते. याचाच परिणाम म्हणून कधीतरी अंडाशयावर (ओव्हरीवर) पाण्याच्या फुग्यासारख्या गाठी निर्माण होतात. त्यातून अजून ‘हॉर्मोन्स’ निर्माण होऊन पाळी अजून पुढे पुढे जाते. त्याचे ‘सोनोग्राफी’वर निदान लगेच होते. मग पाळी येण्याच्या गोळ्या दिल्या की, ‘हॉर्मोन्स’चे प्रमाण अल्प होऊन पाळी येते आणि अंडाशयाची गाठ न्यून होऊ लागते.
४. पाळी नियमित होण्यासाठी स्त्रियांनी सर्व आघाड्यांवर प्रयत्न करणे आवश्यक !
कोणतेही शारीरिक कष्ट नसणे आणि आहारावर नियंत्रण नसणे याचा परिणाम प्रमाणाबाहेर वजन वाढण्यात होतो अन् पाळी अनियमित होऊ लागते. पाळी अनियमित झाली की, वजन अजून वाढते. हे दुष्टचक्र थांबवण्यासाठी नियमित व्यायाम आणि आहारातील कर्बोदके (भात, बटाटा, साखर, मैदा आणि तेल) या गोष्टी अल्प करणे आवश्यक आहे.
‘थायरॉईड’ आणि ‘प्रोलॅक्टिन’ या दोन हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे पाळीच्या समस्या निर्माण होतात. ‘हायपोथायरॉईडिझम्’ची समस्या असेल, तर योग्य उपचार न घेता कितीही प्रयत्न केले, तरी वजन अल्प होत नाही आणि पाळीच्या समस्या सुटत नाहीत. एका नियमित गोळीने स्त्रियांचे आरोग्य पूर्ववत् होऊ शकते. त्यामुळे थायरॉईडच्या गोळीचा उगाच बागुलबुवा करू नये. पाळी अनियमित होण्याची अजूनही बरीच कारणे आहेत. सगळीच कारणे येथे विस्तृतपणे सांगणे अवघड आहे.
मतितार्थ असा की, अनियमित पाळी नियमित होण्यासाठी स्त्रियांनी सर्व आघाड्यांवर प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. घरातील स्त्रीवर पूर्ण घराचा ‘मूड’ अवलंबून असतो. त्यामुळे त्यांनी काळजी घ्यायलाच हवी.’
– डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी, स्त्रीरोग आणि वंध्यत्वतज्ञ, कोथरूड, पुणे.