भंगार चोरी प्रकरणी गुन्हा नोंद करण्याचे सातारा जिल्हाधिकार्यांचे आदेश !
सातारा, ३१ जानेवारी (वार्ता.) – येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या भंगार चोरीप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद करण्याचे आदेश सातारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन (प्रमुख) यांना दिले आहेत.
शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम चालू झाले आहे. यासाठी पाटबंधारे विभागाच्या जुन्या इमारती पाडण्याचे काम चालू आहे. या इमारतीमधील भंगार शासकीय निविदा न काढताच परस्पर विकल्याची घटना घडली आहे. ही घटना उघडकीस आणत राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश उबाळे यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयाबाहेर उपोषणाला प्रारंभ केला होता. याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे आणि बाळासाहेबांची शिवसेनाचे (शिंदे गट) आमदार महेश शिंदे यांनी विधीमंडळात प्रश्न उपस्थित केला होता. तरीही याप्रश्नी कोणतीही हालचाल न झाल्यामुळे उबाळे यांनी २६ जानेवारीला आत्मदहन करण्याची चेतावणी दिली होती.