कळंबोली (रायगड) येथे सनातन संस्थेकडून ‘तणावमुक्त जीवन’ या विषयावर मार्गदर्शन !
३५० महिलांनी घेतला लाभ !
कळंबोली, ३१ जानेवारी (वार्ता.) – कळंबोली येथे ‘गौरव क्लासेस’च्या वतीने महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने सनातन संस्थेकडून ‘स्ट्रेस मॅनेजमेंट’ (तणावमुक्त जीवन) या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते गणेशपूजन आणि दीपप्रज्वलन झाले. श्रीफळ वाढवून कार्यक्रमास प्रारंभ झाला.
१२ फेब्रुवारी या दिवशी होणार्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे निमंत्रण देण्यात आले. सर्व उपस्थित महिलांना सभेला येण्याचे आव्हान करण्यात आले. कळंबोली नवीन सुधागड शाळा सभागृहात ‘गौरव क्लासेस’कडून महिला पालकांसाठी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम पार पाडला. श्री. संतोष वर्तक यांनी ‘क्लासेस’चा उद्देश सांगितला. सनातन संस्थेचे श्री. श्रीकृष्ण उपाध्ये यांनी ३५० महिलांना ‘मनावर येणारा ताण आणि त्यावर उपाय कसे काढावेत ?’ याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. नामजप केल्याने मनावरील ताण न्यून होण्यास साहाय्य होते. या वेळी स्वभावदोष-निर्मूलनाचे महत्त्व सांगतांना सनातन संस्थेचे त्याविषयीचे ग्रंथही दाखवण्यात आले.
सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. उपस्थित जिज्ञासूंनी प्रदर्शनाचा लाभ घेतला. आरोग्य चांगले रहाण्यासाठी श्री. पारस सर यांनी वेगवेगळ्या पद्धतीने शरिरावर होणारे आजार आणि त्यावरील उपाययोजना याविषयीही मार्गदर्शन केले.