श्रीराम आणि श्रीरामचरितमानस यांचा अवमान करणार्यांना त्वरित अटक करा !
बेळगाव येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाद्वारे हिंदुत्वनिष्ठांची मागणी
बेळगाव – बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी ‘संत तुलसीदास रचित ‘श्रीरामचरितमानस’ याला द्वेष पसरवणारा ग्रंथ म्हटले’, तर उत्तरप्रदेशचे समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी ‘श्रीरामचरितमानस’च्या चौपाईवर (दोह्यावर) प्रतिबंध घालण्याची मागणी करतांना हा ग्रंथ कह्यात घेऊन त्याला नष्ट केले पाहिजे’, असे संतापजनक वक्तव्य केले आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांवर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तात्काळ गुन्हे नोंदवून त्यांना अटक करण्यात यावी आणि असे होणारे अवमान रोखण्यासाठी केंद्रशासनाने राष्ट्रीय पातळीवर धर्मनिंदा निषेध कायदा लागू करावा, या मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समिती अन् हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने २७ जानेवारीला ‘डी.सी. कंपाउंड’ येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले.
आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांच्या अनुपस्थित शिरस्तेदार परगी यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. हृषिकेश गुर्जर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. या आंदोलनामध्ये श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. रवी कोकीतकर, भाजपचे श्री. पंकज घाडी, बजरंग दलाचे श्री. विजय होंडाड, ‘कर्तव्य महिला मंडळा’च्या सौ. अक्काताई सुतार आणि सौ. मिलन पवार, हिंदुत्वनिष्ठ श्री. सदानंद मासेकर, तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.