२५ वर्षे विनाअपघात सेवा देणार्या सोलापूर जिल्ह्यातील ५६ चालकांचा परिवहन महामंडळाकडून गौरव !
सोलापूर, ३१ जानेवारी (वार्ता.) – सोलापूर विभागात ‘अपघात सुरक्षितता’ मोहीम ११ जानेवारी ते २५ जानेवारी या कालावधीत राबवण्यात आली. यामध्ये मागील २५ वर्षांत एकदाही अपघात होऊ न देता प्रवाशांची सेवा करणार्या ५६ एस्.टी. चालकांचा विभाग नियंत्रक विनोदकुमार भालेराव यांच्या हस्ते २६ जानेवारी २०२३ या दिवशी सत्कार करण्यात आला. प्रत्येकी २५ सहस्र रुपये, सन्मानपत्र, २५ वर्षे विनाअपघात सेवेचा बिल्ला, स्मृतीचिन्ह, गौरवपत्र, चालकांच्या पत्नीस साडी अन् खण, तसेच पुष्पगुच्छ देऊन चालकांचा गौरव करण्यात आला.
महामंडळ स्तरावर राज्यातील एकूण ७८० चालकांचा गौरव करण्यात आला असून यामध्ये सोलापूर विभागातील सर्वाधिक ५६ चालकांचा समावेश आहे. या प्रसंगी मोठ्या संख्येने चालक, त्यांचे कुटुंबीय आणि सोलापूर विभागातील अधिकारी अन् कर्मचारी उपस्थित होते. या वेळी चालक आणि त्यांचे कुटुंबीय यांनी सत्काराने भारावून गेल्याचे, तसेच एस्.टी.चे मोलाचे साहाय्य झाल्याविषयी मनोगत व्यक्त केले.
संपादकीय भूमिकाअशा चालकांचा अन्य चालकांनी आदर्श घ्यावा. असे कर्तव्यदक्ष चालकच देशाची शक्ती आहे ! |