येत्या आर्थिक वर्षांत सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) ६.५ रहाणार !

नवी देहली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आर्थिक वर्ष २०२३-२४ साठीचे आर्थिक सर्वेक्षण सादर केले. यात सकल राष्ट्रीय उत्पनाचे (जीडीपीचे) प्रमाण (दर) ६.५ इतके वर्तवण्यात आले आहे. या सर्वेक्षणात भारत ही जगातील सर्वांत वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था रहाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

आर्थिक सर्वेक्षण म्हणजे काय?

आर्थिक सर्वेक्षण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती कशी आहे ?, हे दाखवणे. आर्थिक सर्वेक्षणात गेल्या वर्षाचा लेखाजोखा, तसेच आगामी वर्षातील सूचना, आव्हाने आणि उपाय नमूद केलेले असतात. अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाते. आर्थिक सर्वेक्षण एक प्रकारे अर्थव्यवस्थेला दिशा देण्यासारखे काम करते; कारण भारताची अर्थव्यवस्था कशी चालली आहे ? आणि ती सुधारण्यासाठी आपल्याला काय करण्याची आवश्यकता आहे, हे आर्थिक सर्वेक्षण दर्शवते.