सनातनच्या ६४ व्या संत पू. (श्रीमती) शेऊबाई मारुति लोखंडे (वय ८७ वर्षे) यांची त्यांच्या नातसुनेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
१. ‘पू. लोखंडेआजी सतत आनंदी असतात. त्यांचे हास्य पुष्कळ निर्मळ आहे. त्या पुष्कळ निरागस आहेत.
२. वृद्धापकाळात, तसेच अर्धांगवायू झाला असूनही स्वतःची कामे स्वतः करण्याचा प्रयत्न करणे
पू. लोखंडेआजींना अर्धांगवायू (पॅरालिसिस्) झाल्यामुळे त्यांना एका हाताने काहीच करता येत नाही, तरीही त्या सकाळपासून रात्रीपर्यंत अनेक कृती दुसर्या हाताने करतात. त्या एका हाताने दोरीची गाठ बांधू शकतात. त्यांची पांघरायची चादर ‘डबल बेड’वरची असल्याने ती मोठी होती. त्यांनी चादरीची घडी करून एकेरी आकाराची केली. चादरीची घडी विस्कटू नये; म्हणून त्यांनी चादरीचे समोरासमोरील २ कोपरे बांधून ठेवले. त्यामुळे चादर मोठी असली, तरी तिची घडी विस्कटली नाही.
३. व्यवस्थितपणा
अ. त्या प्रत्येक वस्तू ठरलेल्या जागी ठेवतात. आमच्या खोल्यांमधील ‘कोणत्या वस्तू कुठे आहेत ?’, हे त्यांना ठाऊक असते. नेहमीच्या जागेवर असणारी वस्तू दिसली नाही, तर त्या त्याविषयी विचारतात.
आ. त्यांना त्यांच्या पलंगावरील चादर विस्कटलेली आवडत नाही. त्या लगेच ती व्यवस्थित करतात. त्यांनी केलेली चादरीची घडी इतकी सुंदर असते की, तिच्याकडे ‘बघत रहावे’, असे वाटते.
इ. डोक्याला लावलेले तेल उशीला लागू नये, यासाठी त्या उशीवर वेगळे कापड ठेवतात.
४. नियमित व्यायाम करणे
पू. आजी सकाळी उठल्यावर त्यांना सांगितलेला व्यायाम नियमित करतात. त्या झोपूनच पाय हलवणे, हात हलवणे, असे व्यायाम करतात. त्या म्हणतात, ‘‘व्यायाम केल्यामुळे मला बरे वाटते.’’
५. प्रेमभाव
अ. त्यांचे ‘कुणाला काय हवे आहे ?’, याकडे बारकाईने लक्ष असते.
आ. मी सेवा करून रात्री उशिरा खोलीत जाते. पू. आजी माझ्यासाठी खाऊ काढून ठेवतात. ‘मी रात्री खोलीत आल्यावर खाऊ खाल्ला ना ?’, याची त्या दुसर्या दिवशी सकाळी निश्चिती करतात.’
– सौ. रोहिणी भुकन (पू. लोखंडेआजींची नातसून, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(२९.१.२०२२)
खरा परमार्थीखरा परमार्थी असतो तो सतत आत्मपरीक्षण करत असतो, त्याला दुसर्याचे अवगुण दिसतच नाहीत, त्याला आपल्याच अवगुणांचे इतके दर्शन होते की, त्याला इतर सर्वजण परमेश्वररूप भासतात. – ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज |