महाराष्ट्राची ‘साडेतीन शक्तीपीठे आणि स्त्रीशक्ती जागर’ यांवर आधारित चित्ररथाला दुसर्या क्रमांकाचा मान !
उत्तराखंडच्या चित्ररथाला पहिला, तर उत्तरप्रदेशच्या चित्ररथाला तिसरा क्रमांक !
मुंबई – प्रजासत्ताकदिनाला कर्तव्यपथावरील परेडमध्ये सादर करण्यात आलेल्या १७ राज्यांच्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसरा क्रमांक मिळाला आहे. ‘साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर’ यांवर आधारित महाराष्ट्राचा चित्ररथ होता. उत्तराखंडच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला आहे. उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला तिसरा क्रमांक मिळाला आहे.
महाराष्ट्राच्या चित्ररथाच्या समोर गोंधळी होते. गोंधळींचे प्रमुख वाद्य संबळ हेही त्यात दाखवण्यात आले होते. श्री तुळजाभवानीचे गोंधळी चित्ररथाच्या समोर असून त्याच्या मागे साडेतीन शक्तीपीठे म्हणजेच कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि वणी यांचा देखावा सादर करण्यात आला. ही सगळी शक्तीपीठे म्हणजे नारीशक्तीचा केलेला सन्मान होय. पोतराजही चित्ररथात होते. एकूणच महाराष्ट्राची लोककला त्यात सादर केलेली होती.
सप्तशृंगी, रेणुकादेवी, महालक्ष्मी यांच्या प्रतिकृती !महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तीपीठे प्रसिद्ध आहेत. त्यात कोल्हापूरची महालक्ष्मीदेवी, श्रीक्षेत्र तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकादेवी आणि वणीची सप्तशृंगीदेवी या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. त्यामुळे या देवींच्या भव्य आणि तितक्याच सुंदर प्रतिमांचे अन् त्यांच्या माध्यमातून स्त्री सामर्थ्याचे दर्शन कर्तव्यपथावर झाले. |