शिवडी महानगरदंडाधिकारी न्यायालयाकडून हरभजन सिंह पसार म्हणून घोषित !
खासदार नवनीत राणा यांना न्यायालयाची चपराक !
मुंबई – जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणी खासदार नवनीत राणा यांना न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. शिवडी महानगरदंडाधिकारी न्यायालयाकडून राणा यांचे वडील हरभजन सिंह कौर पसार म्हणून घोषित करण्यात आले आहे, तसेच नवनीत राणा आणि त्यांचे वडील यांना १ सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालय आणि मुलुंड पोलीस ठाण्यात प्रविष्ट केलेली प्रकरणे दोन्ही वेगळी आहेत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. हरभजन सिंह कौर १ मासात न्यायालयापुढे उपस्थित न झाल्यास त्यांची संपत्ती जप्त होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ फेब्रुवारीपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
नवनीत राणा अमरावतीमधील ज्या लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत, तो मतदारसंघ अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी राखीव होता. नवनीत राणा यांनी आपण अनुसूचित जातीत असल्याचा दावा करून ती निवडणूक लढवली; मात्र त्यांनी प्रविष्ट केलेले अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला यांमध्ये फेरफार करून ती मिळवल्याचे आढळून आले. त्यानंतर नवनीत राणा आणि त्यांचे वडील हरभजन सिंह अन् राम सिंह कुंडलेस यांच्या विरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणात न्यायालयाने त्यांच्या विरोधात १ मासात २ वेळा वॉरंट बजावले होते. त्या विरोधात राणा यांनी मुंबई सत्र न्यायालयात या प्रकरणातून दोषमुक्त करण्याची विनंती करणारी प्रविष्ट केलेली याचिकाही मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळली होती.