पालघर येथील गौमतेश्वरीमाता अंबाधाम आश्रमात भगवान परशुराम यांच्यासह अन्य देवतांची प्राणप्रतिष्ठा !
डहाणू – मुंबई-कर्णावती महामार्गावरील पालघर तालुक्यातील वाडाखडकोना येथील गौमतेश्वरीमाता अंबाधाम आश्रमात नुकतीच भगवान परशुराम, लक्ष्मीनारायण, महालक्ष्मी, संतोषीमाता या देवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या मंदिराच्या उभारणीसाठी श्री. विनोद सिंह यांनी पुढाकार घेतला. १८ ते २० जानेवारी या कालावधीत पार पडलेल्या या सोहळ्याचा ५ सहस्र भाविकांनी लाभ घेतला.
पालघर जिल्ह्यात भगवान परशुरामांचे हे एकमात्र मंदिर झाले आहे. या कार्यक्रमाला आमदार राजेश पाटील, नगराध्यक्ष भरत राजपूत, माजी आमदार आनंद ठाकूर, तनोज सिंह, परशुराम सेनेचे अध्यक्ष ओमप्रकाश शर्मा, दैनिक ‘परशुराम समाचार’चे संपादक दिलीप सिंह आदी मान्यवर उपस्थित होते.
सनातन संस्थेच्या साधकांचा सत्कार !
या सोहळ्यासाठी आयोजकांकडून सनातन संस्थेला निमंत्रित करण्यात आले होते. सनातन संस्थेच्या वतीने सौ. अर्चना अंधारे आणि त्यांचे पती श्री. हेमंत अंधारे सोहळ्याला उपस्थित होते. गौमतेश्वरी अंबाधाम आश्रमाच्या वतीने स्मृतीचिन्ह देऊन अंधारे दांपत्याचा सन्मान करण्यात आला.
परशुरामांच्या मूर्तीसमवेत कामदेव आणि काळदेव यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार !
भगवान परशुराम यांच्या मूर्तीसमवेत कामदेव आणि काळदेव यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. यासह भगवान परशुराम यांची माता रेणुकादेवीचेही मंदिर बांधण्यात येणार आहे. येत्या २२ एप्रिल या दिवशी हा सोहळा आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री. दिलीप सिंह यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिली.