‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने’ हे दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध होणारे सदर वाचतांना साधिकेला जाणवलेले त्यांचे अनमोलत्व !
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अपार कृपेमुळे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा सत्संग लाभणे आणि त्यांच्या अमृत वचनांतून मन-बुद्धी यांना नवचैतन्य मिळणे
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अपार कृपेमुळे आम्हा साधकांना श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ लाभल्या. हे आमचे परम भाग्य आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’मधून त्यांची अमृतवचने प्रसिद्ध केली जातात. त्यांच्या प्रत्येक वचनात पुष्कळ चैतन्य असल्याने परिस्थितीने मृतवत् झालेले मन आणि बुद्धी यांना नवचैतन्य मिळून ते उत्साही होतात. संघर्षाच्या प्रसंगात स्थिर रहाता येण्यासाठी पुन्हा त्यांना बळ मिळते अन् देवावरील श्रद्धाही वाढते.
२. साधकांना संजीवनी देणार्या प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनांप्रमाणेच ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने’ साधकांच्या साधनेसाठी साहाय्यक ठरणे
प.पू. भक्तराज महाराज यांच्या अनेक भजनांत ‘साधक जीवन जगतांना किंवा साधना करतांना ज्या अडचणी किंवा वेगवेगळी मानसिक आणि आध्यात्मिक स्थिती अनुभवतो, त्यांचे वर्णन आहे, तसेच त्या त्या परिस्थितीत देवाला आळवणे, आर्ततेने प्रार्थना करणे आणि शिकवण इत्यादी सर्व अंतर्भूत आहे. या घोर कलियुगात अन् आपत्काळातही साधकांच्या साधनेसाठी ती भजने ‘अमृत’ म्हणून कार्य करत आहेत. साधकांतील भक्तीभाव वाढवून त्यांना ‘संजीवनी’ प्रदान करत आहेत. या भजनांप्रमाणेच श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचनेही आम्हा साधकांसाठी साहाय्यक ठरत आहेत.
३. अमृत वचनांतून श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांची समष्टीप्रती तळमळ आणि प्रीती जाणवणे
‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे लिखाण सहज, सुंदर आणि सर्वसामान्यांना समजेल’, असे असून ‘ते वाचून कुणालाही साधना करावी’, असे वाटेल’, असे आहे. ‘वाचकांमध्ये भगवंताप्रती अढळ श्रद्धा निर्माण होईल’, इतकी त्यांच्या लेखणीत समष्टीप्रती तळमळ आणि प्रीती जाणवते.
४. ‘अमृतवचनांच्या माध्यमातून श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ समवेत आहेत’, असे वाटून त्यांच्या शब्दांनी आध्यात्मिक ऊर्जा मिळणे
देवा, मी काही न करता अमृतवचनांच्या माध्यमातून मला महालक्ष्मीस्वरूप श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकूंचा सहवास, त्यांची प्रीती आणि कृपा क्षणोक्षणी अनुभवायला मिळत आहे. त्यांची प्रत्यक्ष भेट झाली नाही, तरी ‘त्या माझ्या समवेत आहेत’, असे मला वाटते. त्यांच्या वचनातील प्रत्येक शब्द चैतन्याने भारित असतो. आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकाला या वचनांचा विशेष लाभ होऊन त्याला आध्यात्मिक ऊर्जा मिळते आणि त्याचा त्रास उणावतो.
५. अमृतवचनांमध्ये संकल्प कार्यरत असल्याने वाचताक्षणी कृती करावीशी वाटणे
त्यांचे प्रत्येक वचन अनमोल असून त्या वचनात त्यांचा संकल्प कार्यरत असल्याने वाचताक्षणी ‘कृती करावी’, असे वाटते. त्यामुळे मनाला वेगळाच आनंद अन् नवीन प्रेरणा मिळते.
‘देवा, कोणत्या शब्दांत तुझ्या चरणी कृतज्ञता व्यक्त करू ? श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे प्रत्येक वचन आमच्या हृदयात कोरले जाऊ दे आणि ते आचरणात आणता येऊन आमच्या गुरुमाऊलींना अपेक्षित अशी साधना घडू दे’, हीच कृतज्ञतारूपी प्रार्थना करते. मी याचक असल्याने मागण्याविना मला काही येत नाही. ‘माझी झोळी आणि अंतःकरण कृतज्ञतेने व्यापून जाऊ दे’, हीच तुझ्या चरणी प्रार्थना करते.’
– सौ. नेहा प्रभु, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.५.२०२०)