‘नामनिर्देशित’ व्यक्ती ही खात्याची मालक नव्हे, तर रखवालदार आहे, हे लक्षात घ्या !
१. आर्थिक गुंतवणुकीचा वारस ठरवतांना ज्येष्ठ नागरिकांकडून होणारी चूक
‘अनेक वर्षे वृत्तपत्रांमध्ये कायद्याविषयी लिखाण करतांना मला अनेक सन्माननीय वाचकांचे दूरभाष येत असतात. त्यामुळे त्यांच्या शंकांचे निरसन होते, तसेच कायद्याच्या माहितीचे आदान-प्रदानही होते. विशेष करून यात ज्येष्ठ नागरिकांचे दूरभाष अधिक प्रमाणात असतात. ९९ टक्क्यांहून अधिक ज्येष्ठ नागरिक हे वयोपरत्वे घाबरलेले किंवा आर्थिक गुंतवणुकीच्या संदर्भात कमालीची गुप्तता बाळगून असतात. कायद्याचे पूर्ण ज्ञान नसल्याने म्हणा किंवा आपली सेवानिवृत्तीनंतरची गुंतवणूक कुणाच्या दृष्टीस पडू नये, या दृष्टीने ते भाबडी काळजी घेत असतात. जवळपास सर्वच ज्येष्ठ नागरिकांना असे वाटत असते की, आपल्या मिळकतीची गुंतवणूक, बचत खाते, अधिकोषातील (बँकेतील) निवृत्ती वेतनाचे खाते आणि मुदत ठेवीतील गुंतवणूक यांसाठी आपल्या आवडत्या व्यक्तीला नामनिर्देशित (नॉमिनी) केले की, काम झाले ! ‘असे केल्याने आपल्या पश्चात आपल्या आवडत्या व्यक्तीला आपली गुंतवणूक, तसेच अधिकोषातील रक्कम मिळेल’, अशी भाबडी आशा त्यांना असते. येथेच ते मोठी गडबड करून बसतात.
२. मालकी आणि नामनिर्देशित व्यक्ती या निराळ्या गोष्टी असणे
मा. सर्वाेच्च न्यायालयाने वेळोवेळी स्पष्ट केले आहे की, अधिकोषांमध्ये कोणत्याही गोष्टीला जी नामनिर्देशित व्यक्ती नियुक्त केलेली आहे, ती व्यक्ती केवळ त्या खात्याचा ‘रखवालदार’ आहे, मालक नाही. ‘इंद्राणी वाही विरुद्ध सोसायटी रजिस्ट्रार, बंगाल वर्ष २०१६’च्या अत्यंत गाजलेल्या खटल्यामध्ये सर्वाेच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, मालकी आणि नामनिर्देशित व्यक्ती या दोन निराळ्या गोष्टी आहेत. वंशपरंपरागत आणि वारसदार हे खरेखुरे अन् अस्सल वारस असून सर्व रकमेवर कायदेशीर वारसांचाच हक्क आहे, उदा. एका वडिलांना २ मुले आणि २ मुली आहेत; पण त्यातील एका मुलाशी त्यांचे पटत नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्या सर्व गुंतवणुकीच्या खात्यांवर त्यांच्या आवडत्या मुलाचे नाव ‘नामनिर्देशित व्यक्ती’ म्हणून टाकले असेल आणि पुढे मृत्यूपत्र न करताच त्यांचे निधन झाले, तर त्या खात्याची मालकी कायदेशीर वारसदार म्हणून २ भाऊ अन् २ बहिणी या सर्वांना मिळते. अशा कृतीमुळे आवडत्या समवेत नावडत्या मुलालाही मालकी मिळाली. येथेच गडबड होते.
३. संपत्तीच्या हस्तांतरासाठी ‘नॉमिनेशन’ नाही, तर मृत्यूपत्र हाच उपाय !
‘भारतीय वारस कायदा’ हा मृत्यूनंतर तुमचे कायदेशीर वारस किती आहेत ? ते कोण कोण आहेत ? आणि त्यांना त्यांचा तथाकथित वाटा कसा आहे, हे स्पष्ट करते. तुमची मुले आणि मुली तुमच्यासमवेत कशी वागतात ? त्यांचे चरित्र आणि वर्तन कसे आहे ? तुम्हाला ते आवडतात कि नाही ? याविषयी कायद्याला काहीही देणे-घेणे नसते. अनेक ज्येष्ठ नागरिक या चुकांमुळे फसलेले आहेत. मालकी हक्कासाठी विक्री करणे (सेल डिड), बक्षीसपत्र (गिफ्ट डिड) आणि ‘मृत्यूपत्र’ या तीनच गोष्टी वैध आहेत. ‘नॉमिनेशन’ने संपत्ती हस्तांतर होत नाही. यात ‘सेल डिड’ आणि ‘गिफ्ट डिड’ यांसाठी मुद्रांक शुल्क (स्टँप ड्युटी) लागते. मग विना कटकटीचे, सोपे, सुटसुटीत आिण अगदी अल्प खर्चात होणारे मृत्यूपत्र उपयोगी पडते.
मृत्यूपत्रामध्ये अधिकोषातील खाते, मुदत ठेवीतील गुंतवणूक आणि निवृत्तीवेतन खाते हे कोणत्या वारसाला द्यायचे ? अन् कुणाला नाही ? याचा स्पष्ट उल्लेख करता येतो. ‘अगदी अधिकोषाचे नाव, शाखा आणि खाते क्रमांक यांतील पैसे माझ्या मृत्यूनंतर अमुक अमुक मुलाला किंवा मुलीला द्यावेत’, असे लिहून दिले की, विषय संपतो. मग ती रक्कम आवडत्या व्यक्तीला आणि केवळ तिलाच मिळू शकते, हे येथे लक्षात घेणे आवश्यक आहे; म्हणून मृत्यूपत्र ज्येष्ठ नागरिकांच्या या आवडत्या-नावडत्या समस्येवर रामबाण उपाय आहे. सर्व ज्येष्ठ नागरिकांनी आपापल्या गुंतवणुकीच्या खात्यामध्ये नामनिर्देशित व्यक्ती म्हणून आवडत्या व्यक्तीला नेमले असेल, तर ती चूक ठरेल; कारण त्यामुळे नावडत्या व्यक्तीचाही हक्क त्यावर येतो. सबब मृत्यूपत्राची नोंदणी अधिकृतरित्या करणे अत्यंत महत्त्वाचे आणि हितावह आहे. ज्या मुलाबाळांसाठी संपत्ती जमवली; पण आपल्या पश्चात ती त्यांना मिळालीच नाही, तर उपयोग काय ? मृत्यूपत्राद्वारे अधिकोष आणि गुंतवणुकीचे पैसे आपल्या पश्चात कुणाला आणि कसे मिळावेत ? असे नीट लिहिले की, काम फत्ते ! ‘नामनिर्देशित व्यक्ती’च्या फंदात पुष्कळ हानी होईल. ज्येष्ठांनो, काळजी घ्या !’
– अधिवक्ता शैलेश कुलकर्णी, कुर्टी, फोंडा, गोवा.