श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे
१. ‘सप्तर्षी जीवनाडीपट्टीमध्ये आजपर्यंत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आणि सनातन संस्थेच्या कार्याविषयी जे महर्षींनी सांगितले आहे, त्याचे विवेचन करायला गेलो; तर ती एक ‘महर्षि गीताच’ होईल.
२. देवावर श्रद्धा ठेवून केला जाणारा जीवनप्रवास मनुष्याला एकप्रकारची आंतरिक स्थिरता देतो, तशी स्थिरता त्याच्या अधिकोषातील पैसा त्याला देऊ न शकणे आणि देवाच्या पाठबळावर चालू असणार्या जीवनात पैसा आला काय आणि गेला काय, त्याचे काहीच न वाटणे
मनुष्य आयुष्यात फार कष्ट करून अधिकोषात (बँकेत) त्याच्या जीवनाच्या सुरक्षेच्या अनुषंगाने पैसे साठवून ठेवतो. तसाच अध्यात्मात साधक साधना करून देवाच्या अधिकोषात साधनेचे बळ साठवतो. या साधनेच्या ऊर्जेच्या बळावर तो जीवनातील कठीण प्रवास आनंदाने पूर्ण करतो. ‘तो प्रवास जीवनात कितीही पैसे मोजले, तरी यशस्वी होईलच’, याची खात्री देऊ शकत नाही; मात्र देवावर श्रद्धा ठेवून केला जाणारा जीवनप्रवास मनुष्याला एक प्रकारची आंतरिक स्थिरता देतो. अशी स्थिरता त्याच्या अधिकोषातील पैसा त्याला देऊ शकत नाही. उलट ‘पैसा अधिक साठवला, तर त्याला सांभाळण्याचा व्यापही वाढतो आणि अल्प साठवला, तर ‘तो अधिक कसा होईल ?’, यासाठी जीवनसंघर्ष चालू होतो, म्हणजेच पैसा अधिक असला, तरी संकट आणि अल्प असला, तरी संकट ! याउलट साधनेचे तसे नसते. देवाच्या पाठबळावर चालू असणार्या जीवनात पैसा आला काय आणि गेला काय, त्याचे काहीच वाटत नाही. उलट स्थिर रहाता येते; म्हणून जीवनात साधनेचे महत्त्व पुष्कळच आहे.
३. आध्यात्मिक पातळी चांगली असणे, म्हणजे देवाच्या अधिकोषात भरभक्कम रक्कम असणे आणि ‘अध्यात्म जगणे’ ही जीवनात सर्वांत सुखावह गोष्ट असणे
आजचा काळ पहाता अधिकोषातील पैशांचीही शाश्वती राहिली नाही. हे ‘पैसे केवळ या जन्मापुरतेच मर्यादित असतात; पण साधनेने कमावलेले पुण्यबळ, हे आपल्याला जन्मोजन्मी, अगदी मृत्यूनंतरही कामी येते.’ हेच अध्यात्माचे वैशिष्ट्य आहे; म्हणून ‘आध्यात्मिक पातळी चांगली असणे’, म्हणजे ‘देवाच्या अधिकोषात भरभक्कम रक्कम असण्यासारखे आहे.’ हे धन कुणी चोरायची भीती नाही कि ‘ते अधिक झाले; म्हणून त्याला आता सांभाळायचे कसे ?’, यासारखा तणावयुक्त विचारही नाही. ‘अध्यात्म जगणे’ ही जीवनात सर्वांत सुखावह गोष्ट आहे.
४. देवाने ठरवलेल्या नियोजनाप्रमाणे वागणे, म्हणजे साधना करणे आणि साधना केली, तर आपण देवाने नेमून दिलेल्या सात्त्विक कर्माच्या प्रवाहात आपोआपच पुढे पुढे जाऊन त्यातील जीवनाचा आनंद घेऊ शकणे
आपला दिनक्रम देवाने ठरवलेला असतो. त्याच्या नियोजनाप्रमाणे वागणे, म्हणजे साधना ! त्यात हस्तक्षेप करून जाणीवपूर्वक काहीतरी करायला गेलोे, तर वेळ वाया जातो; कारण असे करणे देवाला अपेक्षित नसते. बरेच जण विचारतात, ‘देवाला अपेक्षित काय आहे’, हे आम्हाला कसे कळणार ?’ उत्तर सोपे आहे, ‘साधना वाढवा, म्हणजे कळेल.’ साधना केली; तर आपण देवाने नेमून दिलेल्या सात्त्विक कर्माच्या प्रवाहात आपोआपच पुढे पुढे जात रहातो आणि त्यातील जीवनाचा आनंद घेऊ शकतो. नाहीतर स्वतःच्या मनाने जगणार्या मनुष्याला जीवन नकोसे झालेले असते; कारण त्याच्या जीवनात आनंदाची साठवण करून देणार्या ईश्वरासाठी जागा नसते.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (१७.४.२०२०)