‘ऑनलाईन’ रमी खेळण्यासाठी वाहनांच्या बॅटर्या चोरणार्यांना पोलिसांनी केले जेरबंद !
सातारा, ३० जानेवारी (वार्ता.) – ‘ऑनलाईन’ रमी खेळण्याचा छंद जडल्यामुळे पैसे संपू लागले. पैसे नसल्यामुळे चारचाकी वाहनांच्या बॅटर्या चोरून त्या विकायच्या आणि आलेल्या पैशांत ऑनलाईन रमी खेळण्याचा छंद पूर्ण करणार्या संशयिताला सातारा पोलिसांनी जेरबंद केले आहे. सुजित दिनकर झुंजार असे संशयिताचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून ७ लाख रुपयांच्या बॅटर्या हस्तगत केल्या आहेत.
सातारा येथील औद्योगिक वसाहतीजवळील महामार्गालगत असलेल्या सेवा रस्त्यावर उभ्या असणारी चारचाकी वाहने आणि ट्रक यांच्या बॅटर्या चोरीला जात होत्या. याविषयीच्या अनेक तक्रारी सातारा पोलिसांकडे आल्या होत्या. या अनुषंगाने सातारा पोलीस गस्त घालत असतांना त्यांना एक व्यक्ती संशयितरित्या वावरतांना आढळून आली. तिला कह्यात घेऊन चौकशी केली असता त्याने ट्रक, टेंपो, जेसीबी अशा वाहनांच्या ३६ बॅटर्या चोरी केल्याचे सांगितले, तसेच आपल्याला ऑनलाईन रमी खेळण्याचे व्यसन लागल्यामुळे बॅटर्या विकून त्यातून आलेल्या पैशाने रमी खेळत असल्याचे संशयिताने मान्य केले.