खलिस्तानवाद्यांचा बीमोड !
ऑस्ट्रेलियामध्ये भारताचे झेंडे घेऊन जाणार्यांवर तेथील काही खलिस्तानवाद्यांनी आक्रमण करून त्यांना मारहाण केली आणि त्यांच्या हातातील झेंड्यांचीही विटंबना केली. ऑस्ट्रेलियातही आता खलिस्तान्यांचे वर्चस्व वाढत असल्याची ही घटना द्योतक आहे. खलिस्तान्यांची भारतातील कुरघोडी रोखण्यासाठी शासन कोणते कडक धोरण अवलंबणार आहे, हे या निमित्ताने पुढे येणे अपेक्षित आहे.
१८ सप्टेंबर २०२२ या दिवशी कॅनडामधील ब्रैम्पटन शहरात १० सहस्रांहून अधिक खलिस्तानवादी एकत्र आले. ‘सिख फॉर जस्टिस’ या भारतापासून पंजाब प्रांत वेगळा मागणार्या भारतविरोधी खलिस्तानी संघटनेने हे आंदोलन केले. त्या वेळी कॅनडा सरकारने अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली हे आंदोलन होऊ दिले. कॅनडाने एवढ्या प्रचंड संख्येने भारतविरोधी संघटना फोफावू देणे, ही भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने विचार करण्यासारखी गोष्ट आहे; कारण या घटनेनंतर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी त्या वेळी या घटनेला हास्यास्पद म्हणून ‘कट्टरवाद्यांचे देश तोडण्याचे षड्यंत्र’ असल्याचे सांगितले. भारत तोडण्याचे षड्यंत्र हे हास्यास्पद असू शकत नाही, तर ते योजनापूर्वक आणि विचारपूर्वक केलेले आहे.
खलिस्तान्यांचा इतिहास आणि योजना
९३ वर्षांपूर्वी मोतीलाल नेहरू यांनी ‘पूर्ण स्वराज्या’चा प्रस्ताव ठेवला. त्या वेळी ३ गटांनी त्याला विरोध केला. त्यांपैकी पहिला गट जीनांच्या मुस्लिम लीगचा होता, दुसरा डॉ. आंबेडकरांच्या दलित गटाचा होता, तर तिसरा तारासिंह यांच्या शिरोमणी अकाली दलाचा होता. हे खलिस्तानवाद्यांचे मूळ होते. तेव्हापासून शिखांना भारतापासून एक प्रांत तोडून हवा होता. ‘भारताचे तुकडे करण्याचे फुटीरतावाद्यांचे मनसुबे इंदिरा गांधी यांनी वर्ष १९८४ मध्ये राबवलेल्या ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’नंतर संपले’, असे भारतियांना वाटत असतांनाच इंदिरा गांधींची हत्या झाली. त्यानंतर विदेशात खलिस्तानवाद्यांची संघटना छुप्या पद्धतीने वाढत राहिली. गुरपतवंतसिंह पन्नू याने वर्ष २००७ मध्ये ‘सिख फॉर जस्टिस’ ही अमेरिकेत स्थापन केलेली भारतविरोधी संघटना आज जगभरात ‘जनमत’ घेण्याच्या नावाखाली भारतविरोधी द्वेष पसरवून खलिस्तानची मागणी करत खलिस्तानवाद्यांचे संघटन करत आहे. देहलीतील शाहीनबाग आंदोलनाला भरभरून अन्न पुरवणारे खलिस्तानवादी होते आणि कृषी कायदे रहित करण्यासाठी देहलीच्या रस्त्यांवर १ वर्षभर सरकारविरोधी आंदोलन करून सरकारला जेरीस आणण्यामागे अन् शेवटी ते कायदे रहित करण्यास भाग पाडण्यामागील छुपी शक्तीही खलिस्तान्यांची होती, हे लपून राहिलेले नाही. या घटनांवरून भारतविरोधी खलिस्तान्यांची शक्ती, भारताबाहेर त्यांचे फोफावणे आणि विदेशातून या फुटीरतावाद्यांना मिळणारे भरघोस आर्थिक साहाय्य हे उघड झाले. ५ जानेवारी २०२२ या दिवशी पंजाबमध्ये फिरोजपूर येथे भाजपच्या ‘रॅली’त सहभागी होण्यासाठी गेलेले पंतप्रधान मोदी यांना वाटेत पुलावर थांबावे लागले आणि काही वेळातच सुरक्षेच्या कारणास्तव मागे फिरावे लागले. देशाच्या पंतप्रधानांच्या जिवावर उठण्यापर्यंत खलिस्तान्यांचे छुपे कारस्थान पोचले आहे, हेही त्या वेळी सिद्ध झाले. देशाच्या पूर्वपंतप्रधानांचा बळी घेतलेले खलिस्तानवादी किती घातक पावले उचलत आहेत ? याची नोंद घेऊन सरकारने त्यानंतर योग्य ती पावले उचलली असतीलच.
वैचारिक प्रतिवादही हवा !
आजपर्यंत हिंदूंनी शिखांना वेगळ्या धर्माचे कधीच न मानता हिंदु धर्मीयच मानले होते; परंतु इंग्रजांच्या प्रेरणेने काँग्रेसी हिंदुद्वेषी राज्यकर्त्यांनी ‘शीख धर्म’ म्हणून वेगळा उल्लेख करणे चालू केले. नुकतेच गुरु हरकिशन सिंह पब्लिक स्कूलमधील एका संगीत शिक्षिकेने सरस्वतीचे पूजन केल्यावरून ‘देहली सिख गुरुद्वारा प्रबंधक कमेटी’ने तिला थेट निलंबित केले. ‘मूर्तीविरोधक इस्लामशी जवळीक असणार्या खलिस्तानी विचारांचा हा प्रभाव आहे का ?’, असा प्रश्न या घटनेमुळे निर्माण होत आहे. भारतीय आणि हिंदू यांच्याविषयी द्वेषाचे पोषण करणार्या खलिस्तान्यांनी आतंकवाद्यांशी हातमिळवणी केल्याचे भारतातील सरकारविरोधी आंदोलनातून वेळोवेळी उघड झाले. ‘शेकडो शीख क्रांतीकारकांनी या भारतभूच्या स्वातंत्र्यासाठी बलीदान दिले आहे, ते खलिस्तान वेगळा व्हावा म्हणून नव्हे ! त्यांच्याच समाजाची पुढची पिढी भारतमातेचे तुकडे करण्यासाठी आतुर झाली आहे. हे कितपत योग्य आहे ?’, असा प्रश्न विचारून शीख बांधवांमध्ये राष्ट्रअस्मिता जागृत करणे आज आवश्यक आहे. भारताचा शत्रू म्हणून आतंकवाद्यांना जवळ करणारे शीख पाकमध्ये शीख मुली आणि बांधव यांच्यावर होणार्या अत्याचारांकडे डोळेझाक करतात. ‘पाकमध्येही शिखांचे गुरुद्वारा आणि तीर्थक्षेत्रे आहेत; मग तेथील भूमीची मागणी खलिस्तानवादी करणार का ?’, असा प्रश्न त्यांना विचारला गेला पाहिजे. ‘इस्लामसाठी शीख हेही काफीरच आहेत’, हे सत्य त्यांच्या नसानसांत भिनवले पाहिजे. इस्लामच्या विरोधात शिखांच्या धर्मगुरूंनी दिलेला लढा, त्यासाठी उभी केलेली सेना, इस्लामी राजांनी शिखांचा केलेला अनन्वित छळ आणि शिखांनी त्याविरोधात लढतांना केलेले बलीदान यांची शिकवण सातत्याने शीख समाजात जागृत ठेवून त्यांनाच खलिस्तान्यांना विरोध करण्यास सांगितले पाहिजे. या दृष्टीने सरकार काही पावले उचलत आहे का? हे सरकारने सांगितले पाहिजे.
शीख बांधव आणि खलिस्तानप्रेमी यांना त्यांच्या खर्या इतिहासाची जाणीव करून देऊन त्यांची राष्ट्रअस्मिता जागृत केली पाहिजे. शेवटी कुठलेही आंदोलन किंवा चळवळ यामागे काही वैचारिक पाया असतोच. खलिस्तान्यांचा वैचारिक पाया कसा पोकळ आहे आणि त्यांचा खरा शत्रू भारत किंवा हिंदू नसून इस्लाम हाच आहे, हे त्यांना सांगत गेले, तर खलिस्तानी चळवळीला विरोध करणार्यांना साहाय्य होईल. इस्लाममधील त्रुटी वैचारिक स्तरावर पुढे आल्यावर आज जगभरातून त्याला विरोध होत आहे. ज्याप्रमाणेच खलिस्तानवादी चळवळ मुत्सद्देगिरीने कडक धोरण अवलंबून मोडून काढली पाहिजे, त्याचसमवेत येथील शिखांमध्येही वैचारिक प्रबोधन केले पाहिजे !
खलिस्तान्यांची भारतद्वेषी चळवळ मोडून काढण्यासाठी सरकारने पावले उचलणे आवश्यक ! |