पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना होणारा विरोध आणि शस्त्ररूपी शुद्धी चळवळ
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी शुद्धी चळवळीवर जोर दिला होता. मुसलमान आणि ख्रिस्ती धर्मातील धर्मप्रसारक हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर करून हिंदूंचे संख्याबळ रोडावण्याचा प्रयत्न करत होते. स्वतःचे संख्याबळ वाढवणे आणि संपूर्ण जग इस्लाममय अन् ख्रिस्तमय करण्याचा प्रयत्न करण्यासाठी हिंदूंचे धर्मांतर करण्यात येते. त्यांच्या या कुकृत्याला शह देण्यासाठी सावरकर यांनी शुद्धी चळवळ आरंभली. ही चळवळ म्हणजे हिंदूंचे संख्याबळ अबाधित ठेवण्यासाठी उपयोगात आणलेले एक मोठे शस्त्र आहे. स्वामी श्रद्धानंद यांनी याचाच उपयोग करून हिंदूंचे संख्याबळ घटणार नाही, याची काळजी घेतली. त्याचाच परिणाम म्हणून त्यांची हत्या करण्यात आली.
१. धर्मांतरित झालेल्यांना हिंदु धर्मात परत घेतल्यास तो अपराध ठरवला जाणे
मुसलमान आणि ख्रिस्ती यांनी हिंदूंना फसवून, लालूच दाखवून, प्रसंगी बळ अन् छळ यांचा वापर करून हिंदूंना धर्मांतरित केले. जगाच्या दृष्टीने मुसलमान आणि ख्रिस्ती यांचे हे कुकृत्य न्याय्य ठरवण्यात आले. ‘हिंदूंनी धर्मांतरित झालेल्या आपल्या बांधवांना पुनश्च शुद्ध करून स्वतःच्या धर्मात घेतले, तर मात्र तो अपराध ठरतो’, असा उपराठा न्याय आज जगात प्रतिष्ठा पावला आहे.
थोडक्यात सर्व बाजूंनी हिंदूंना वेठीला धरायचे, त्यांच्यावर अन्याय करायचा, त्यांच्या श्रद्धास्थानांवर आघात करायचा आणि जर त्यांनी त्याला विरोध करून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रयत्न केला, तर ‘हिंदू असहिष्णू’ असल्याची बोंबाबोंब करायची. तोच न्याय म्हणून निकाल द्यायचा. हे हिंदूंना नष्ट करण्याचे षड्यंत्र आहे, हे धडधडीत दिसत असतांना सुद्धा आपल्याच देशातील आपलेच हिंदु बांधव आपल्यावरच उलटतात, ही खरी शोकांतिका आहे.
२. उत्तराखंडमध्ये ख्रिस्त्यांकडून होत असलेले धर्मांतर आणि मुख्यमंत्र्यांनी घेतलेली नोंद
२४ डिसेंबर २०२२ या दिवशी उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील छिवाला गावात ख्रिस्त्यांनी ३५ हिंदूंचे धर्मांतर घडवून आणले. त्यासाठी एक प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली. या प्रार्थना सभेला मसूरी येथील चर्चचे पाद्री जेजारस कोर्निलियस आणि त्यांची पत्नी पुष्पा कोर्निलियस यांना आमंत्रित करण्यात आले. हे दांपत्य गेली अनेक वर्षे धर्मांतराचे काम करते. त्यांच्या विरोधात पोलिसांकडे गार्हाणे नोंदवण्यात आले. पोलीस आता त्यांचे अन्वेषण करत आहेत. अशा प्रार्थना सभा आयोजित करून आजूबाजूच्या गावांतील हिंदूंना तेथे पाचारण करण्यात येते. विविध प्रकारची प्रलोभने दाखवून त्यांना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त केले जाते. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी पोलीस महानिर्देशक यांना याविषयी लक्ष घालण्यासह ‘या घटनांकडे गांभीर्याने बघा’, असेही सांगितले.
३. अन्य पंथियांचे इस्लामी वा ख्रिस्ती राष्ट्राचे स्वप्न धुळीला मिळणे
देशभरात अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडत आहेत. हिंदूंच्या धर्मांतराच्या घटनांना आळा घालण्यासाठी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री हे धर्मांतरित झालेल्या आपल्या बांधवांना पुनश्च स्वधर्मात शुद्ध करून घेतल्याचे कळताच हिंदूंच्या विरोधात षड्यंत्र आखणार्या सर्व लोकांचा जळफळाट झाला. त्यांच्यावर आकाश कोसळले. मुसलमान आणि ख्रिस्ती हे दोन्ही धर्म एकाच वेळी धोक्यात आले. सहिष्णुता मृत झाली. ‘राज्यघटनेला तिलांजली दिली’, असा भास सर्वांना होऊ लागला; कारण हिंदू सजग झाला आहे. तो आता अन्याय सहन करत नाही. हिंदूंमधील प्रतिकारशक्ती कार्यरत झाली. याचाच आता सर्वांना त्रास होत आहे; कारण हिंदुस्थानचे इस्लामी वा ख्रिस्ती राष्ट्रात परिवर्तन घडवून आणण्याचे स्वप्न धुळीला मिळाले आहे.
४. पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना विरोध करण्यामागील कारण
ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्या श्रद्धास्थानांवर आघात केला, तर ती ईशानिंदा ठरते. त्यासाठी मृत्यूदंड ही एकमेव शिक्षा; पण हिंदूंच्या श्रद्धास्थानांवरती आघात केल्यावर मात्र ती वैज्ञानिक दृष्टी ठरते. ती ईशानिंदा ठरत नाही. असे घोषित करणार्यांना हिंदूंकडून चोख उत्तर देण्यात येत असल्यामुळे ‘या देशातील ख्रिस्ती आणि मुसलमान घाबरलेले आहेत’, अशी आवई उठवली जाते. ते सत्य आहे; कारण त्यांच्या हिंदु धर्म नष्ट करण्याच्या कार्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. त्यांचे ध्येय आता त्यांना गाठता येणार नाही, याचेच त्यांना भय वाटते; म्हणूनच ‘पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना विरोध करण्याचा घाट घातला जात आहे’, असा निष्कर्ष कुणी काढला, तर त्यात चूक नाही.
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (२५.१.२०२३)