(म्हणे) ‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली समाजात विष पेरण्याचे काम !’ – अजित पवार, विरोधी पक्षनेते
ईश्वरपूर (जिल्हा सांगली) – ‘लव्ह जिहद’च्या नावाखाली समाजात विष पेरण्याचे काम चालू आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी जाती-जातींत तेढ निर्माण केली जात आहे. त्याविरोधात ज्या प्रमाणात उठाव व्हायला पाहिजे होता, तसा तो होतांना दिसत नाही, असे मत राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अजित पवार यांनी व्यक्त केले. कासेगाव येथील क्रांती वीरांगणा इंदुमती पाटणकर यांच्या स्मारकाचे उद्घाटन विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. (अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणासाठी जाणीवपूर्वक दिशाभूल करणारी विधाने करणारे राजकीय नेते आणि त्यांचे पक्ष यांना हिंदूंनी यापुढील निवडणुकीच्या काळात त्यांची जागा दाखवून देणेच योग्य ! – संपादक)
१. क्रांती विरांगणा इंदुमती पाटणकर यांनी स्वातंत्र्यलढ्याच्या समवेतच जाती-अंताचा लढा उभा केला. त्यांनी अनेक आंतरजातीय विवाह लावून दिले. आतासुद्धा याच भूमीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दोन्ही मुलांनी आंतरजातीय विवाह केले आहेत. अलीकडे ‘सेक्युलर’ या शब्दाला कुठे तरी तिलांजली देण्याचा प्रयत्न काही जण करतात. हे भारताच्या दृष्टीने अतिशय अडचणीचे होणार आहे. (भारत स्वतंत्र झाल्यानंतर बनवण्यात आलेल्या राज्यघटनेत ‘सेक्युलर’ हा शब्द नव्हता. हा शब्द तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळात घटनेत घुसडला. याचसमवेत ‘सेक्युलर’च्या नावाखाली बहुसंख्य असलेल्या हिंदूबहुल देशात सर्व लाभ हे अल्पसंख्यांकांनाच मिळत आहेत ! असे असूनही अजित पवार ‘सेक्युलर’ शब्दाचीच पाठराखण करत आहेत, हे अनाकलनीय आहे ! – संपादक)
२. प्रत्येकाने प्रत्येकाच्या धर्माचा आदर करावा. कुणाच्याही धर्माने एखाद्या धर्माविषयी आकस बाळगावा, असे सांगितलेले नाही. आपल्या धर्माची प्रार्थना आपापल्या धर्म मंदिरात करावी, घरात करावी; बाहेर वावरतांना प्रत्येकाने ‘नागरिक’ या नात्याने वावरावे. (हे उपदेशाचे डोस अजित पवार यांनी अगोदर अल्पसंख्यांक समाजाला पाजावेत ! ‘प्रत्येकाने अन्य धर्माचा आदर करावा’, या गोष्टी बोलण्यासाठी ठीक असतात आणि प्रत्यक्षात परिस्थिती उलट आहे. मुसलमान समाजातील लोकप्रतिनिधी, सरकारी कर्मचारीही टोपी घालणे, कामावर असतांना नमाज पढणे, भर रस्त्यात किंवा सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करणे, असे करून धर्मपालन करतात आणि त्यांचे धर्माचे विशेषत्व जपण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अल्पसंख्यांकांनी त्यांच्या धर्माचे जाहीर प्रदर्शन करावे आणि हिंदूंनी मात्र त्यांचा धर्म घरात पाळावा, असे कसे होईल ? अर्थात् अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन हीच विचारसरणी असणार्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून वेगळी अपेक्षा काय करणार ? – संपादक)