पुलावरून खाली पडल्याने १२ काळविटांचा एकाच वेळी मृत्यू !
सोलापूर – केगाव ते हत्तूर या बाह्यवळण महामार्गावरील ३० फूट उंच पुलावरून १४ काळविटांच्या कळपाने खाली उड्या टाकल्या. त्यात १२ काळविटांचा जागीच मृत्यू झाला, तर २ काळवीट गंभीर घायाळ असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. २८ जानेवारीच्या सायंकाळी ही घटना घडली. यापूर्वीच्या अशाच घटनांमध्ये २ काळविटांचा मृत्यू झाला होता. त्या वेळी प्राणीमित्रांनी त्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची मागणी केली होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि वनविभाग यांनी कोणत्याही हालचाली केल्या नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रिया प्राणीमित्रांनी व्यक्त केली. (वन्य प्राण्यांच्या सुरक्षेसाठी उदासीन असलेला वनविभाग ! – संपादक) जड वाहतूक शहराबाहेर जाण्यासाठी पुणे रस्त्यावरील केगाव येथून हत्तूरपर्यंत बाह्य वळणाचे काम पूर्ण झाले. हिरज, बेलाटी, तिर्हे या गावांच्या परिसरात अधिक काळवीट आहेत. त्यांचे कळप रस्ता ओलांडून जायचे; परंतु पूल बांधल्यानंतर त्यांना अंदाज येत नसल्याने अशा घटना घडत आहेत, असे वनविभागाच्या अधिकार्यांनी सांगितले.