संस्कृतला देशाची अधिकृत भाषा बनवा ! – माजी सरन्यायाधीश शरद बोबडे
नागपूर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संस्कृत भाषेला देशाची अधिकृत भाषा बनवण्याचा प्रयत्न केला होता, असे ११ सप्टेंबर १९४९ या दिवशीच्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले होते. संस्कृतमधील शब्द आपल्या देशातील अनेक भाषांमध्ये आहेत. ‘डॉ. आंबेडकर यांना वाटत होते त्याप्रमाणे संस्कृतला अधिकृत भाषा का बनवले जाऊ शकत नाही ? ही भाषा उत्तर किंवा दक्षिण येथील नाही. ही भाषा धर्मनिरपेक्षतेसाठी पूर्ण सक्षम आहे’, असे सांगत माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी संस्कृतला देशाची अधिकृत भाषा बनवण्याची मागणी केली. ‘संस्कृत भारती’कडून आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी संमेलनात ते बोलत होते. ‘संस्कृतला अधिकृत भाषा म्हणून स्वीकारणे एका रात्रीत शक्य नाही. त्यासाठी काही वर्षे लागू शकतील’, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
देश की आधिकारिक भाषा बने संस्कृत… पूर्व CJI चीफ बोबडे बोले- ये बाबा साहेब का सपना था#MaharashtraNews | #SharadBobdehttps://t.co/ULaexsUmOg
— TV9 Bharatvarsh (@TV9Bharatvarsh) January 28, 2023
माजी सरन्यायाधीश बोबडे यांनी मांडलेली सूत्रे
१. कायद्यानुसार न्यायालयाची अधिकृत भाषा म्हणून हिंदी आणि इंग्रजी यांचा वापर केला जातो. अनेकदा सरन्यायाधिशांकडे प्रादेशिक भाषांचाही वापर करण्याविषयी निवेदने दिली जातात. आता काही जिल्हा आणि उच्च न्यायालय यांमध्ये प्रादेशिक भाषांचा वापर केला जात आहे.
२. मला वाटत नाही की, हे सूत्र प्रलंबित रहायला हवे. शासन आणि प्रशासन यांच्यात संवाद होत नसल्याने ते पूर्ण होण्यात अडचण आहे.
३. संस्कृतला अधिकृत भाषा बनवण्यामागे कोणत्याही धर्माचे देणेघेणे नाही; कारण ९५ टक्के भाषांचा संबंध धर्माशी नाही, तर दर्शन, कायदा, साहित्य, शिल्पकला, खगोलशास्त्र आदींशी संबंध असतो.
४. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या शास्त्रज्ञांनीही या भाषेला संगणकासाठी उपयुक्त समजले आहे. त्यांनी ‘कृत्रिम बुद्धीमत्तेच्या संदर्भात संस्कृतवर संशोधन केले आहे. अल्प शब्दांत संदेश पाठवण्यासाठी या भाषेचा वापर होऊ शकतो’, असे म्हटले आहे.
५. देशातील ४३.६३ टक्के लोक हिंदी बोलतात, तर केवळ ६ टक्के नागरिक इंग्रजी बोलतात, असे सर्वेक्षणातून समोर आले आहे. ग्रामीण भागात तर ३ टक्के लोकच इंग्रजी बोलतात. ४१ टक्के श्रीमंत लोक इंग्रजी बोलतात, तर गरीबांमध्ये इंग्रजी बोलणारे केवळ २ टक्केच आहे.
६. संस्कृत हीच अशी एकमेव भाषा आहे जी प्रादेशिक भाषांसमवेत राहू शकते. हा दावा मी भाषातज्ञांशी चर्चा केल्यानंतरच करत आहे; कारण प्रादेशिक भाषेत बोलतांना अनेक संस्कृत शब्दांचा वापर केला जातो. उर्दू भाषेसह अनेक भाषांत संस्कृतचे शब्द आहेत. मराठी, आसामी, हिंदी, तेलुगु, बंगाली, कन्नड आदी भाषांमध्ये ६० ते ७० टक्के संस्कृत शब्द आहेत.
संपादकीय भूमिकादेशाच्या एका माजी सरन्यायाधिशांनी अशा प्रकारचे विधान करणे, ही मोठी गोष्ट आहे. केंद्र सरकारने याविषयी गांभीर्याने विचार करावा, असे धर्माभिमानी हिंदूंना वाटते ! |