उपजतच दैवी गुण असलेल्या, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे आज्ञापालन करून त्यांचे मन जिंकणार्या आणि अध्यात्मातील अवघड टप्पेही लीलया पार करणार्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !
‘मला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या संदर्भातील पूर्वीचे काही प्रसंग आठवतात. तेव्हा ‘त्यांच्यातील ईश्वरी गुण सुप्तावस्थेत होते’, हे आता माझ्या लक्षात येत आहे. ‘आज्ञापालन’ आणि ‘ईश्वरप्राप्तीची तीव्र तळमळ’ हे गुण अन् गुरुकृपेच्या बळावर श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी ‘स्वतःतील दैवी गुण कसे विकसित केले ?’, याचे साक्षीदार असणार्या काही साधकांपैकी मीही एक आहे. माझ्या अल्प मतीला लक्षात आलेले आणि स्मरणात राहिलेले काही प्रसंग मी कृतज्ञतापूर्वक मांडण्याचा प्रयत्न करत आहे. २८.१.२०२३ या दिवशी यातील काही प्रसंग आपण पाहिले. आज उर्वरित भाग पाहू.
(भाग २)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/649263.html
८. ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना सूक्ष्मातून ज्ञान मिळणे’, या प्रक्रियेला झालेला आरंभ !
८ अ. अनेक पुस्तकांचा अभ्यास करूनही परात्पर गुरु डॉक्टरांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे न मिळाल्याने गुरुदेवांनी सौ. अंजली गाडगीळ यांना देवाला उत्तरे विचारायला सांगणे आणि त्यांना सूक्ष्मातून उत्तरे मिळू लागणे : परात्पर गुरु डॉक्टरांनी सौ. अंजली गाडगीळ यांना पुन्हा संगीताशी संबंधित सेवा करायला सांगितली. परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांना विविध प्रश्न विचारून त्यांची उत्तरे शोधायला सांगितली, उदा. संगीतात ७ च स्वर का असतात ? आठवड्यातील दिवस ७ आहेत आणि इंद्रधनुष्यातील रंगही ७ आहेत. त्यांचा संगीताशी काही संबंध आहे का ? ही उत्तरे मिळवण्यासाठी सौ. अंजलीताईंनी त्यांच्याकडे असलेली सर्व पुस्तके अभ्यासली; पण त्यांना ती उत्तरे मिळाली नाहीत. त्यांनी परात्पर गुरु डॉक्टरांना तसे सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘तुम्ही देवाला विचारून सूक्ष्मातून उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करा !’’ त्यानुसार प्रयत्न केल्यावर ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे वाक्य म्हणजे जणू संकल्पच आहे’, याची सौ. अंजलीताईंना प्रचीती आली. त्यांना गुरुदेवांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळू लागली आणि सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्याच्या त्यांच्या प्रक्रियेला आरंभ झाला.
८ आ. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांची सूक्ष्मातून जाणण्याची अफाट क्षमता ! : परात्पर गुरु डॉक्टरांचा संकल्प आणि सौ. अंजलीताई सतत करत असलेल्या आर्त प्रार्थना, यांमुळे त्यांना सूक्ष्मातील ज्ञानाच्या समवेत पुढे पुढे सूक्ष्मातून दिसू आणि जाणवूही लागले. त्यानंतर त्यांची सूक्ष्मातून जाणण्याची क्षमता अफाट वाढली. इतरांना काही कळण्यापूर्वीच त्यांना कळू लागले.
१. सौ. अंजलीताईंना साधकांवर होणारी वाईट शक्तींची विविध प्रकारची आक्रमणे सूक्ष्मातून कळायची.
२. वर्ष २००७ मध्ये एकदा सौ. अंजलीताई म्हणाल्या, ‘‘कु. स्वाती (आताच्या सद्गुरु स्वाती खाडये) किती निर्मळ आहे ! तिचे मन अतिशय पारदर्शक आहे.’’ नंतर काही वर्षांतच, म्हणजे वर्ष २०१३ मध्ये कु. स्वाती खाडये ‘संत’ झाल्या आणि नंतर अवघ्या २ वर्षांत, म्हणजे वर्ष २०१५ मध्ये त्यांनी ‘सद्गुरुपद’ प्राप्त केले.
३. वर्ष २००९ मध्ये एकदा मी आश्रमात महाप्रसाद ग्रहण करत होते. भोजनकक्षातील खिडक्या मोठ्या असल्याने महाप्रसाद ग्रहण करणारे साधक भोजनकक्षाच्या बाहेरूनही दिसू शकतात. अकस्मात् सौ. अंजलीताई माझ्याजवळ येऊन म्हणाल्या, ‘‘तुमची हाडे दुखत आहेत का ? लांबून पहातांना मला तुमचे केवळ डोके दिसले आणि ‘या व्यक्तीची हाडे दुखत आहेत’, असे जाणवले.’’ प्रत्यक्षातही दोन दिवसांपासून माझी सर्व हाडे दुखत होती; पण मी त्याविषयी कुणालाही सांगितले नव्हते. असे असूनही सौ. अंजलीताईंनी ते अचूक ओळखले.
९. क्षणार्धात महत्त्वाचे निर्णय घेऊन त्यानुसार आचरण करणे
९ अ. पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेणे : ‘ईश्वरप्राप्ती हेच मनुष्यजन्माचे ध्येय आहे’, हे लक्षात आल्यावर त्वरित पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेऊन डॉ. मुकुल गाडगीळ आणि सौ. अंजली गाडगीळ लगेचच साधना करण्यासाठी गोव्यात रहायला आले. मुलगी कु. सायली ‘शाळेत रमत नाही’, हे लक्षात येताच सौ. अंजलीताईंनी ‘तिला साधना करता यावी’, यासाठी पुष्कळ प्रयत्न केले. त्यामुळे कु. सायली ही पूर्णवेळ साधना करणारी सर्वांत पहिली युवा साधिका ठरली.
९ आ. ‘पंजाबी पोशाखाच्या तुलनेत साडी अधिक सात्त्विक आहे’, हे कळल्यावर स्वतःकडील सर्व पंजाबी पोशाख अर्पण करणे : पूर्वी सौ. अंजलीताई पंजाबी पोशाख घालायच्या. ‘त्या पोशाखाच्या तुलनेत साडी अधिक सात्त्विक आहे’, हे समजताच त्यांनी नेहमी साडीच नेसण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्वतःकडील सर्व पंजाबी पोशाख अर्पण केले. तेव्हा त्यांनी नुकतेच ४ – ५ नवीन पंजाबी पोशाख शिवून आणले होते. ते नवीन कोरे पोशाखही त्यांनी अर्पण केले. ‘स्वतःकडे एकजरी पोशाख ठेवला, तरी तो घालण्याचा मोह होईल’, या विचाराने त्यांनी सर्व पोशाख देऊन टाकले.
सर्वसाधारण व्यक्तीला असे निर्णय घेणे अत्यंत कठीण असते; मात्र सौ. अंजलीताई यांनी तो टप्पा सहज पार केला.
१०. मनातील इच्छा आपोआप पूर्ण होतात, यासंदर्भात श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना आलेल्या अनुभूती
१० अ. ‘मुलीसाठी बडबड गीतांची ध्वनीफीत आणावी’, असे ठरवल्यावर एका साधकाने आपणहून ती आणून देणे : एकदा सौ. अंजलीताईंच्या मनात आले, ‘मला सेवेतील व्यस्ततेमुळे सायलीकडे लक्ष देता येत नाही. तिच्यासाठी काहीतरी करायला हवे. तिच्यासाठी बडबड गीतांची ध्वनीफीत (कॅसेट) आणून तिला ऐकवूया.’ दुसर्याच दिवशी त्यांना एका साधकाने बडबड गीतांची एक ध्वनीफीत आणून दिली आणि म्हणाले, ‘‘मी माझ्या मुलीसाठी ध्वनीफीत घेतच होतो. अकस्मात् मला सायलीची आठवण आली; म्हणून मी तिच्यासाठीही घेतली.’’
१० आ. सौ. अंजलीताईंना पपई खाण्याची इच्छा होणे, याविषयी डॉ. मुकुल गाडगीळ यांना ठाऊक नसतांनाही फळविक्रेत्या बाईने आग्रह केल्याने त्यांनी पपई विकत आणणे : एकदा सौ. अंजलीताईंना पपई खाण्याची इच्छा झाली; मात्र त्यांनी त्याविषयी कुणाला सांगितले नाही. त्याच दिवशी डॉ. मुकुल गाडगीळ काहीतरी आणायला एका दुकानात गेले होते. दुकानाबाहेर बसलेल्या फळविक्रेत्या बाईने त्यांना पपई विकत घेण्यासाठी आग्रह केला. तिने अगदी अल्प किमतीत ती घेण्याचा आग्रह केल्यामुळे डॉ. मुकुल गाडगीळ यांनी पपई विकत घेतली. नंतर पपई पाहून सौ. अंजलीताई म्हणाल्या, ‘‘मला पपई खाण्याची इच्छा झाली’, हे तुम्हाला कसे कळले ?’’ तेव्हा त्यांनी घडलेली गोष्ट सौ. अंजली यांना सांगितली.
११. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना देवतांचे सूक्ष्मातून झालेले दर्शन
११ अ. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील उच्च कोटीच्या भक्तीभावामुळे श्री दत्तगुरु आणि श्री शांतादुर्गादेवी यांनी मंदिराबाहेर येऊन त्यांना सूक्ष्मातून दर्शन देणे : वर्ष २००५ मध्ये रामनाथी, गोवा येथे आश्रम बांधल्यानंतर डॉ. मुकुल गाडगीळ आणि सौ. अंजली गाडगीळ दुचाकी गाडीने घरातून रामनाथी आश्रमात येऊ लागले. ‘थोडा व्यायाम व्हावा’, या हेतूने सौ. अंजलीताई मध्ये वाटेतच उतरून आश्रमापर्यंत चालत यायच्या. चालतांना त्या निसर्गातील चैतन्य आणि आनंद अनुभवण्याचा प्रयत्न करायच्या. आश्रमात येतांना वाटेत कवळे येथे श्री दत्तगुरु आणि श्री शांतादुर्गादेवी अशी २ मंदिरे आहेत. मंदिराच्या जवळ आल्यावर सौ. अंजलीताई सूक्ष्मातून मंदिराच्या आत जाऊन श्री दत्तगुरु आणि श्री शांतादुर्गादेवी यांचे दर्शन घेऊन पुढे आश्रमात जायच्या.
२ दिवसांनंतर त्या श्री दत्तगुरूंच्या मंदिराजवळ येताच त्यांना सूक्ष्मातून ‘श्री दत्तगुरु दर्शन देण्यासाठी मंदिराच्या बाहेर येऊन थांबले आहेत’, असे दिसले. श्री दत्तगुरूंचे भावपूर्ण दर्शन घेऊन त्या पुढे चालू लागल्या. पुढे श्री शांतादुर्गादेवीच्या मंदिराजवळ येताच त्यांना सूक्ष्मातून ‘देवीही मंदिराच्या बाहेर येऊन थांबली आहे’, असे दिसले. देवीला भावपूर्ण नमस्कार करतांना देवी अंजलीताईंना म्हणाली, ‘मी तुझीच वाट पहात होते.’
या अनुभूतींवरून ‘सौ. अंजलीताईंमधील भक्तीभाव किती उच्च कोटीचा होता’, ते लक्षात येते.
११ आ. रामनाथी आश्रमातील स्वागतकक्षात अनेक देवतांचे दर्शन होणे : वर्ष २००६ मध्ये एकदा सौ. अंजलीताईंना सूक्ष्मातून रामनाथी आश्रमातील स्वागतकक्षात ‘सूक्ष्म आकारात असंख्य देवता वावरत आहेत’, असे दिसले. त्यांनी देवतांना याविषयी विचारल्यावर त्या म्हणाल्या, ‘आम्ही साधकांचे रक्षण करण्यासाठी येथे आलो आहोत.’
११ इ. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना स्वप्नात श्रीकृष्णाने त्यांचा हात धरून त्यांना वायूवेगाने स्वतःसमवेत नेल्याचे दिसणे : वर्ष २००८ मध्ये एकदा सौ. अंजलीताईंना पहाटे एक स्वप्न पडले. स्वप्नात त्या आश्रमातील त्यांच्या खोलीच्या बाहेरील मार्गिकेत होत्या. तेव्हा श्रीकृष्ण त्यांच्या समोर आला आणि म्हणाला, ‘माझ्या समवेत यायचे आहे का ?’ सौ. अंजलीताईंनी ‘हो’, असे म्हटल्यावर श्रीकृष्णाने त्यांचा हात धरला आणि तो चालायला लागला. हळूहळू त्याच्या चालण्याचा वेग वाढू लागला. तो वेग इतका वाढला की, सौ. अंजलीताईंना त्या वेगाने चालणे कठीण झाले. त्यांनी श्रीकृष्णाला तसे सांगितल्यावर त्याने अंजलीताईंचा हात घट्ट धरला आणि वार्याच्या वेगाने हवेत निघून गेला.
११ इ १. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना पडलेले स्वप्न, म्हणजे साधनेत वेगाने होणार्या त्यांच्या प्रगतीची पूर्वसूचना ! : सौ. अंजलीताईंना पडलेले स्वप्न म्हणजे जणू साधनेत वेगाने होणार्या त्यांच्या प्रगतीची पूर्वसूचनाच होती. वर्ष २००० मध्ये त्यांनी साधनेला आरंभ केला आणि वर्ष २०१० मध्ये त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. त्यानंतर अवघ्या ३ वर्र्षांत, म्हणजे वर्ष २०१३ मध्ये त्यांनी संतपद प्राप्त केले. वर्ष २०१६ मध्ये त्या सद्गुरुपदी विराजमान झाल्या आणि वर्ष २०१९ मध्ये महर्षींनी त्यांना जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘एक आध्यात्मिक उत्तराधिकारी’ म्हणून घोषित केले.
१२. उच्चतम आध्यात्मिक पद प्राप्त करूनही अहंचा लवलेश नसणार्या श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ !
सौ. अंजलीताई माझ्यापेक्षा साधारण १० – ११ वर्षांनी लहान आहेत. त्यामुळे आमची ओळख झाल्यानंतर काही दिवसांतच मी त्यांना म्हणाले, ‘‘तू माझ्यापेक्षा वयाने लहान असल्यामुळे येथून पुढे मी तुला एकेरीत संबोधेन.’’ त्या म्हणाल्या, ‘‘काही अडचण नाही. तुम्ही खुशाल माझ्याशी एकेरीत बोला.’’ पुढे त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्यावरही मी त्यांच्याशी एकेरीतच बोलत होते. त्यानंतर त्या ‘संत’ म्हणून घोषित होण्याच्या ८ दिवस आधी मी त्यांना म्हणाले, ‘‘तू ‘संत’ झालीस, तरीही मी तुझ्याशी एकेरीतच बोलीन.’’
तेव्हा तीव्र अहंकारामुळे मी ‘वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध आणि तपोवृद्ध हे नेहमीच वंदनीय असतात’, हे विसरले होते. त्यानंतर मला माझ्या तीव्र अहंकाराची जाणीव झाली. तेव्हा मी त्यांची प्रत्यक्ष क्षमा मागू शकले असते; परंतु मी तेही केले नाही.
क्षमायाचना
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणी मी क्षमायाचना करते. ‘हे श्रीदेवी (महर्षींनी जीवनाडीपट्टीद्वारे संबोधलेले नाव), या अहंकारी जिवाला क्षमा करा. माझी चूक अक्षम्य आहे, तरीही या लिखाणाच्या माध्यमातून मी तुमच्या चरणी क्षमा मागत आहे. हे वात्सल्यमूर्ती देवी, मला क्षमा करा !’
– सौ. विजयलक्ष्मी आमाती, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.९.२०२२)
|