ठाकुर्ली (ठाणे) येथे अल्पवयीन मुलीवर २ तोतया पोलिसांकडून सामूहिक बलात्कार !
ठाणे, २८ जानेवारी (वार्ता.) – ठाकुर्ली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील गर्द झाडीत १७ वर्षांच्या मुलीवर पोलीस असल्याची बतावणी करून २ अज्ञात तरुणांनी बलात्कार केला. २७ जानेवारीला ही घटना घडली. विष्णूनगर पोलीस ठाणे येथे पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी २ तरुणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
१. अल्पवयीन मुलगी आणि तिचा मित्र २७ जानेवारीला दुपारी ३.३० वाजता ठाकुर्ली पश्चिम रेल्वे स्थानक भागात फिरण्यासाठी आले होते. त्या वेळी तेथे आलेल्या २५ ते ३० वर्षे वयोगटातील २ तोतया पोलिसांनी ‘तुमची चौकशी करायची आहे,’ अशी बतावणी करून त्या दोघांना निर्जनस्थळी नेले.
२. पोलीस असल्याने पीडित मुलगी आणि तिचा मित्र घाबरले होते. निर्जनस्थळी जाताच तोतया पोलिसांमधील एकाने तिच्यावर बलात्कार केला. दुसर्याने चित्रीकरण करून ‘हा प्रकार कुणाला सांगितला, तर हे चित्रीकरण सामाजिक माध्यमांवर प्रसारित करू’, अशी धमकी देत त्यानेही बलात्कार केला.
३. विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी सीसीटीव्ही चित्रण पाहून आरोपींच्या अन्वेषणासाठी ५ पथके रवाना केली आहेत. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
संपादकीय भूमिकानैतिकतेचे मोठ्या प्रमाणात झालेले हनन दर्शवणारी घटना ! अशा घटना कायमच्या रोखण्यासाठी बलात्कार करणार्यांना तात्काळ आणि कठोर शिक्षा द्यायला हवी, तसेच समाजाला धर्मशिक्षण देऊन नीतीमान करायला हवे ! |