जिवे मारण्याची धमकी देणार्या पुणे येथील तरुणाला अटक !
शाम मानव यांना मिळालेल्या धमकीचे प्रकरण
नागपूर – अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष शाम मानव यांच्या घरावर बाँब टाकण्याची आणि त्यांना जिवे मारण्याची धमकी देणार्या पुणे येथील तरुणाला बंदुकीसह पोलिसांनी अटक केली. या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी पुणे येथे शाम मानव यांचा मुलगा रहात असलेल्या ठिकाणची सुरक्षा वाढवली आहे, असे वृत्त ‘एबीपी माझा’ या मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.
शाम मानव यांनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांच्यावर अंधश्रद्धा पसरवत असल्याचा आरोप केला होता. यातून दोघांनीही एकमेकांना आव्हाने दिली होती. या प्रकरणी २६ जानेवारी या दिवशी पुणे येथील हिंजवडी पोलीस ठाण्यात धमकी देणार्या तरुणाच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शाम मानव यांचा मुलगा क्षितीज यामिनी यांनीही या प्रकरणी तक्रार प्रविष्ट केली आहे. २१ आणि २२ जानेवारी या दिवशी व्हॉट्सॲपवर त्यांना धमकीचे संदेश आले आहेत.
(म्हणे) ‘धमकी देणार्यांमध्ये ‘सनातन प्रभात’सारखे लोक असू शकतात !’
शाम मानव यांनी तोडले अकलेचे तारे !
‘सनातन प्रभात’ हे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत असलेले वृत्तपत्र आहे. या माध्यमातून समाजप्रबोधन, समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे कार्य गेल्या २५ वर्षांपासून नि:स्वार्थीपणे केले जात आहे. यातून हिंदू मोठ्या प्रमाणात जागृत होत असल्यानेच मानव यांना पोटशूळ उठला आहे आणि त्यातूनच ते असे खोटे आरोप करत आहेत, हेच यातून स्पष्ट होते !
शाम मानव म्हणाले की, धमकीची घटना गंभीर असून असे घडेल, याची कल्पना मला, पोलीस आणि सरकार सर्वांना आधीपासूनच आहे. यामागे कोण आहे ?, हे सर्वांना ठाऊक आहे. दाभोळकर आणि पानसरे यांच्या हत्यांनंतर मी लगेच यामागे कोण आहे ?, हे कुणी केले ?, याविषयी सर्व सांगितले होते. यामागे ‘ब्रेनवॉश’ (बुद्धीभेद) केलेले तरुण असून यापूर्वीच्या चारही हत्या प्रकरणात पोलिसांना प्रथमपासून माहिती होती; मात्र पुरावे मिळत नव्हते. जे जे हिंदु धर्मात सुधारणांविषयी काही करतात, ते सर्व हिंदु धर्मविरोधी आणि सैतान आहेत’, असे त्यांच्या डोक्यात भरवले जाते. पुणे येथे पकडला गेलेला माणूस त्याच यंत्रणेतून सिद्ध झालेला आहे का ? तो ‘ब्रेनवॉश’ (बुद्धीभेद) केलेला आहे का ? त्याविषयी पोलीस शोध घेतील आणि सत्य समोर आणतील. या सर्वांमागे ‘सनातन प्रभात’सारखे लोक असू शकतात. (पोलिसांनी पकडलेल्या तरुणाचे नाव आणि त्याची चौकशी केल्यानंतरची माहिती अद्याप घोषित केलेली नाही. असे असतांना श्याम मानव बेधडकपणे ‘सनातन प्रभात’चे नावे कसे घेतात ? यातून मानव यांच्यात सनातनद्वेष किती भिनला आहे, हे लक्षात येते. मानव यांना मिळालेल्या धमकीच्या प्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणले पाहिजे ! मानव यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाविषयी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी सनातन अधिवक्त्यांचा समादेश घेत आहे ! – संपादक)