नागरिकांच्या उपोषणानंतर लक्ष्मीवाडी, कुडाळ येथील गॅस केंद्र अवैध असल्याचे घोषित
कुडाळ – शहरातील लक्ष्मीवाडी येथे ‘महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनी’ने उभारलेले गॅस केंद्र अवैध असून याच्या बांधकामासाठी संबंधितांनी कोणतीही अनुमती घेतलेली नाही. त्यामुळे या केंद्रावर कारवाई करण्यात येईल, असे शहर नगरपंचायतीच्या प्रशासकीय अधिकारी गीतांजली नाईक यांनी सांगितल्याने हा प्रकल्प अवैध होता हे स्पष्ट झाले.
हे गॅस केंद्र लोकवस्तीत उभारण्यात आले आहे. या केंद्राच्या सभोवताली लोकवस्तीसह श्री महालक्ष्मीदेवी मंदिर आणि शाळा आहेत. येथून जाणारा रस्ता शहरातील रहदारीचा आहे. त्यामुळे प्रकल्प स्थलांतरित करावा, तसेच प्रकल्पासाठी अनुमती घेतली आहे का ? याची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली होती. यासाठी येथील नगरसेविका चांदणी कांबळी आणि नागरिक यांनी २६ जानेवारी या दिवशी नगरपंचायत कार्यालयाजवळ उपोषण केले होते. या वेळी नगरपंचायतीच्या प्रशासकीय अधिकारी गीतांजली नाईक यांनी ‘हा प्रकल्प अवैध आहे. याच्या बांधकामासाठी कोणतीही अनुमती संबंधित आस्थापनाकडून घेण्यात आलेली नाही. त्यामुळे या या प्रकल्पावर कारवाई करण्यात येईल, असे पत्र’ उपोषणकर्त्यांना दिले. त्यामुळे हे उपोषण मागे घेण्यात आले. (कोणत्याही प्रकारची अनुमती न घेता शहरात लोकवस्तीच्या ठिकाणी एखाद्या प्रकल्पाचे काम कुणाच्या पाठिंब्याने झाले होते ? याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली पाहिजे. जनतेने आवाज उठवला नसता, तर नगरपंचायत प्रशासन सुस्त राहिले असते का ? – संपादक)
सांडपाण्याची व्यवस्था न करणार्या विकासकावर कारवाई होणार
कुडाळ शहरामध्ये उभारण्यात आलेल्या ‘शुभम् शांती’ या निवासी संकुलाचे सांडपाणी लगत असणार्या रहिवाशांच्या भूमीमध्ये जाऊन तेथील विहिरींतील पाणी दूषित झाले आहे, तसेच दुर्गंधी पसरली आहे. याच्या विरोधात हरिश काष्टे, डॉ. सवदत्ती, सुधीर जडये, योगेश नाईक यांनी २६ जानेवारीला उपोषण केले होते. याविषयी बांधकाम विभागाचे अभियंता विशाल होडावडेकर यांनी, ‘नगरपंचायत अधिनियमानुसार विकासकावर कारवाई करण्यात येईल’, असे पत्र दिल्यावर उपोषण मागे घेण्यात आले.
संपादकीय भूमिकानागरिकांना केंद्र अवैध असल्याचे कळते, ते न कळणारे नगरपंचायत प्रशासन काय कामाचे ? अवैध बांधकाम उभे राहीपर्यंत प्रशासन काय करत होते ? |