‘संतांनी देवाला नमस्कार केल्यावर त्यांच्या स्वतःवर आणि देवतेच्या प्रतिमेवर होणारा परिणाम’ या संदर्भातील संशोधन !
‘संतांनी देवाला नमस्कार केल्यावर त्यांच्या स्वतःवर आणि देवतेच्या प्रतिमेवर होणारा परिणाम’ या संदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘सर्वसाधारण व्यक्तीने देवाला नमस्कार केल्यावर तिला चैतन्य मिळते. सर्वसाधारण व्यक्तीच्या तुलनेत भाव असलेल्या साधकाने देवाला नमस्कार केल्यावर त्याला अधिक प्रमाणात चैतन्य मिळते. संत म्हणजे ईश्वराचे सगुण रूप ! ‘संतांनी देवाला नमस्कार केल्यावर त्यांच्या स्वतःवर आणि देवतेच्या प्रतिमेवर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे एक चाचणी केली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन पुढे दिले आहे.
१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन
या प्रयोगात सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांनी देवतेला नमस्कार करण्यापूर्वी आणि केल्यानंतर त्यांची अन् देवतेच्या प्रतिमेची छायाचित्रे काढून त्यांची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली.
१ अ. सद्गुरु गाडगीळकाका यांनी देवतेला नमस्कार केल्यावर त्यांच्या स्वतःवर आणि देवतेच्या प्रतिमेवर झालेले परिणाम : सद्गुरु गाडगीळकाका यांच्यामध्ये आरंभी (नमस्कार करण्यापूर्वी) काही प्रमाणात नकारात्मक स्पंदने अन् पुष्कळ प्रमाणात सकारात्मक स्पंदने होती. देवतेच्या प्रतिमेमध्ये आरंभी नकारात्मक ऊर्जा काहीच नसून सकारात्मक ऊर्जा होती. सद्गुरु गाडगीळकाकांनी देवतेच्या प्रतिमेला नमस्कार केल्यावर त्यांच्यातील नकारात्मक स्पंदने नाहीशी झाली; पण देवतेच्या प्रतिमेमध्ये काही प्रमाणात नकारात्मक स्पंदने आढळून आली आणि दोघांतील सकारात्मक ऊर्जा वाढली. हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.
२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
२ अ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी देवतेला केलेल्या भक्तीपूर्ण नमस्कारामुळे साक्षात् देवता त्यांच्या रक्षणासाठी कार्यरत होणे : सद्गुरु गाडगीळ यांनी देवतेला नमस्कार केल्यावर त्यांना पुष्कळ चैतन्य मिळाले. सद्गुरु गाडगीळकाकांनी देवतेच्या प्रतिमेला नमस्कार केल्यानंतर त्यांच्या भोवतीची नकारात्मक स्पंदने नाहीशी झाली; पण देवतेच्या प्रतिमेमध्ये काही प्रमाणात नकारात्मक स्पंदने आढळून आली. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. याचे कारण हे की, सद्गुरु गाडगीळकाकांच्या भक्तीमुळे साक्षात् देवता त्यांच्या रक्षणार्थ धावून आली. देवतेने तिचे भक्त असलेले सद्गुरु गाडगीळकाका यांच्या भोवतीची त्रासदायक स्पंदने स्वतःकडे खेचून घेऊन नष्ट करण्यास आरंभ केला. याचा तात्कालिक परिणाम म्हणून देवतेच्या प्रतिमेमध्ये काही प्रमाणात नकारात्मक स्पंदने आढळून आली. (या छायाचित्रांची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे चाचणी करणारे साधक श्री. आशिष सावंत यांनाही असेच जाणवले.)
२ आ. साधकांचे आध्यात्मिक त्रास दूर होऊन त्यांची साधना सुलभतेने व्हावी, यासाठी अविरतपणे झटणारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ ! : सद्गुरु गाडगीळकाका साधकांचे आध्यात्मिक त्रास दूर व्हावे, यासाठी सतत प्रयत्नरत आहेत. हे एक प्रकारे त्यांचे वाईट शक्तींशी चालू असलेले सूक्ष्म युद्धच आहे. या सूक्ष्म युद्धाचा तात्कालिक परिणाम म्हणून काही वेळा त्यांच्याभोवती काही प्रमाणात नकारात्मक स्पंदनांचे आवरण येते. त्यांनी देवतेला केलेल्या भक्तीपूर्ण नमस्कारामुळे देवता स्वतः कार्यरत झाली आणि तिने संतांचे रक्षण केले. ‘सद्गुरु गाडगीळकाका यांसारख्या समष्टी-कल्याणार्थ कार्य करणार्या आणि भक्त असणार्या संतांवर कृपा करण्यासाठी देवता सदैव तत्पर असतात’, हेच या उदाहरणातून लक्षात येते. साधकांचे आध्यात्मिक त्रास दूर होऊन त्यांची साधना सुलभतेने व्हावी, यासाठी अविरतपणे झटणारे सद्गुरु गाडगीळकाका यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (११.१.२०२३)
ई-मेल : mav.research2014@gmail.com
३. देवतेच्या प्रतिमेला नमस्कार केल्यावर सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना स्वतःत आणि देवतेच्या प्रतिमेत जाणवलेले पालट
टीप १ – देवतेच्या प्रतिमेमध्ये सिंहासनावर श्रीराम आणि सीता बसलेले आहेत. श्रीरामाचे भाऊ भरत आणि शत्रुघ्न त्यांना चवर्या ढाळत (वारा घालत) आहेत. तसेच श्रीराम आणि सीता यांच्या चरणांशी मारुति आणि श्रीरामाचा आणखी एक भाऊ लक्ष्मण बसले आहेत. देवतेच्या या प्रतिमेवरील त्रासदायक शक्तीचे आवरण त्या प्रतिमेतील केवळ श्रीरामाच्या डोळ्यांवरच आलेले जाणवले. याचे कारण म्हणजे मी देवतेच्या प्रतिमेला नमस्कार करतांना त्या प्रतिमेतील केवळ श्रीरामाकडेच अधिकतर बघत होतो.
टीप २ – देवतेच्या प्रतिमेवर थोडे आवरण आले असूनही, ती प्रतिमा स्पष्ट आणि उजळलेली दिसली. याचे कारण म्हणजे मी देवतेला नमस्कार केल्यामुळे माझ्यातील भावामुळे ‘बिंब-प्रतिबिंब’ या न्यायाने देवतेमध्येही भाव निर्माण झाला. प्रतिमेतील प्रत्येक देवतेचे डोळे आधी साक्षीभावात बघणारे होते, ते त्यांच्यात भाव प्रकट झाल्याने पाणीदार दिसू लागले. हा पालट त्या प्रतिमेतील सर्वच देवतांमध्ये झाला.
३ अ. वरील सारणीतून लक्षात आलेली सूत्रे
१. मी देवतेच्या प्रतिमेला नमस्कार केल्यामुळे माझ्यातील भावाची स्पंदने पुष्कळ प्रमाणात वाढली.
२. माझ्याप्रमाणे देवतेच्या प्रतिमेतीलही भावाची स्पंदने वाढली, तसेच त्या प्रतिमेतील चैतन्याची स्पंदनेही वाढली.
३. मी देवतेच्या प्रतिमेला नमस्कार केल्यामुळे माझ्यावरील त्रासदायक शक्ती नष्ट झाली. ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या चाचणीमध्येही माझ्यावरील त्रासदायक स्पंदने पूर्णपणे दूर झाल्याचे लक्षात आले. तसेच मी नमस्कार केल्यावर देवतेच्या प्रतिमेने माझ्यातील त्रासदायक स्पंदने खेचून घेतली. त्यामुळे देवतेच्या प्रतिमेमध्ये त्रासदायक स्पंदने आली. हेही ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या चाचणीमध्ये लक्षात आले.
४. मी देवतेच्या प्रतिमेला नमस्कार केल्यावर माझ्या चेहर्यामध्ये चांगला पालट झाला आणि तो स्पष्ट, आनंदी अन् उजळलेला दिसू लागला. तसेच माझे डोळेही पाणीदार दिसू लागले. त्याप्रमाणेच देवतेच्या प्रतिमेमध्येही चांगला पालट होऊन तीही स्पष्ट आणि उजळलेली दिसू लागली. तसेच देवतेच्या प्रतिमेतील सर्व देवतांचे डोळे पाणीदार दिसू लागले. मी आणि देवतेची प्रतिमा यांमधील हे चांगले पालट ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या चाचणीमध्ये आमच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये झालेल्या वाढीवरूनही स्पष्ट होतात.
४. सारांश
‘देवतेला भक्तीभावाने नमस्कार केल्यावर सूक्ष्मातून काय परिणाम होतो ?’, हे या प्रयोगातून स्पष्ट झाले. तसेच ‘भक्तीभावाने नमस्कार केल्यामुळे देवतेची कृपादृष्टी आपल्यावर कशी होते ?’, हेही या प्रयोगातून लक्षात येते. देवाला भक्तीभावाने नमस्कार करण्याचे, हे महत्त्व आहे. ‘देव असतो का ?’, या बुद्धीप्रामाण्यवादी आणि नास्तिक यांच्या प्रश्नाला या प्रयोगातून उत्तर मिळेल. देव सूक्ष्मातीसूक्ष्म आहे आणि त्याच्यापर्यंत नमस्काराची सूक्ष्मातील स्पंदने पोचतात. त्यामुळे देव दगडाचा असो, चित्रातील असो किंवा त्याला नुसता आपल्या डोळ्यांसमोर आणला असो, त्याला मनोभावे केलेली प्रार्थना त्याच्यापर्यंत पोचतेच, हे या प्रयोगातून सिद्ध होते.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१४.१.२०२३)
|