हिंदु राष्ट्राच्या दिशेने…!
राजस्थानमधील भीनमाल येथे ७ व्या शतकातील प्राचीन नीलकंठ महादेव मंदिराच्या जीर्णाेद्धारानंतर तेथे महोत्सव होत आहे. या महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भक्तांना संबोधित केले. या वेळी त्यांनी ‘सनातन धर्म हाच भारताचा राष्ट्रीय धर्म आहे’, असे म्हटले आहे. भारतीय राज्यघटनेत ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द घुसवून भारताला निधर्मी बनवणार्या काँग्रेसच्या अधर्मीय कृतीला हे सडेतोड उत्तर आहे. या विधानानंतर निधर्मीपणाचा वृथा अभिमान बाळगणार्यांकडून काही प्रतिक्रिया आली नसती, तर ते नवल होते. वरील भाष्यावर प्रतिक्रिया देतांना पूर्वी भाजपमध्ये खासदार असलेले आणि आता काँग्रेसमध्ये गेलेले उदित राज म्हणाले, ‘‘भारत हिंदु राष्ट्र झाले, तर अन्य धर्मियांचे काय होणार ?’’ साम्यवादी आणि निधर्मी यांच्याकडून वारंवार उपस्थित केला जाणारा हा प्रश्न त्यांनी विचारला. भारत सोडून जगातील बहुतांश देशांनी त्यांचा धर्म घोषित केला आहे; मग तो देश लोकशाही असलेला असो किंवा राजेशाही ! त्यामुळेच जगात १५७ ख्रिस्ती आणि ५२ मुसलमान देश आहेत. त्या सर्व देशांत हिंदु जनता रहाते, तशी इथे अन्य धर्मीय जनता राहू शकत नाही का ? ‘जगातील अन्य इस्लामी राष्ट्रांपेक्षा भारतात मुसलमान सुखी आणि सुरक्षित आहेत’, असे त्या राष्ट्रांतील अनेक नागरिक अन् मोठ्या पदावरील व्यक्ती सांगतात. यापुढेही भारतात हिंदु राष्ट्र आले, तरी मुसलमान किंवा ख्रिस्ती हे सुरक्षित; किंबहुना अधिक सुरक्षित रहातील, हे कदाचित् उदित राज हेही जाणून असतील; मात्र अशा प्रकारे विधाने करून विनाकारण विरोध निर्माण करण्यासाठी ते काही प्रेरणांनी प्रवृत्त झालेले असण्याची शक्यता अधिक आहे.
सध्या प्रसिद्धीच्या झोतात आलेले आणि राष्ट्रातील समस्या सुटण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापण्याची मागणी करणारे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना विरोध करणारे ‘ऑल इंडिया मुस्लिम जमात’चे अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन म्हणाले, ‘‘येथे हिंदु किंवा इस्लामी राष्ट्र बनू शकत नाही. त्यामुळे तुम्ही स्वप्ने पहाणे बंद करा.’’ वर्ष २०४७ पर्यंत भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्याच्या ध्येयाने वाटचाल करणार्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया यांसारख्या आतंकवादी संघटनांकडून त्याचे पुरावे मिळाले आहेत. ‘जर आतंकवाद्यांचे हे इस्लामी राष्ट्र बनवण्याचे ध्येय नाही, तर काश्मीरमध्ये आतंकवादी आक्रमणे अद्यापही प्रतिदिन का चालू आहेत ?’, याचे उत्तर मौलाना शहाबुद्दीन देतील का ? भारताला ‘खुरासन’ बनवण्याची स्वप्ने पहाणार्यांना ‘भारत मुसलमान राष्ट्र बनू शकत नाही’, हे सांगण्याचे धाडस मौलाना शहाबुद्दीन यांच्याकडे आहे का ? त्यामुळे ‘आज हिंदूंनी हिंदु राष्ट्राची मागणी केली नाही, तर त्यांना उद्या इस्लामी राष्ट्रात रहाण्याची वेळ येईल, अशी स्थिती आहे’, हे नाकारून चालणार नाही.
हिंदु राष्ट्राची पूर्वसिद्धता !
गोवर्धन पुरी मठाचे शंकराचार्य जगद्गुरु निश्चलानंद सरस्वती यांनी वर्ष २०२५ मध्ये ‘भारत हिंदु राष्ट्र होईल’, असे म्हटले आहे. ‘हिंदु राष्ट्र कधी येईल ?’, या प्रश्नाचे उत्तर देतांना ‘सुदर्शन वाहिनी’चे संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी सांगितले, ‘‘ज्या दिवशी प्रत्येक हिंदु धर्मीय हिंदु राष्ट्राच्या मागणीसाठी रस्त्यावर येईल, त्या वेळी ते आलेले असेल.’’ अयोध्येतील संत परमहंस यांनी हिंदु राष्ट्रासाठी १६ दिवस उपोषण केले आणि ‘२३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत हिंदु राष्ट्र स्थापन न झाल्यास अन्नत्याग करीन’, अशी घोषणा केली आहे. शंकराचार्य परिषदेशी संबंधित ‘हिंदु राष्ट्र संविधान निर्माण समिती’ने हिंदु राष्ट्राच्या राज्यघटनेशी संबंधित ७५० पृष्ठांची मार्गदर्शक पुस्तिका सिद्ध केली आहे. ती या वर्षीच्या माघमेळ्यात सादर करण्यात येऊन त्यावर तज्ञांची मते घेण्यात येणार आहेत.
सनातन धर्माच्या पुनरुत्थानाचे आव्हान
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेले वरील विधान हिंदु राष्ट्राची मागणी जोर धरू लागल्याच्या पार्श्वभूमीवर स्वागतार्ह आहे; पण सनातन धर्माचे अपेक्षित पुनरुत्थान ही सोपी गोष्ट नाही. कागदोपत्री हिंदु राष्ट्र येणे, हे राज्यघटनेत सुधारणा करून आणणे एक वेळ सोपे आहे; परंतु ‘हिंदु राष्ट्राची घडी बसवणे’, हे एक मोठे आव्हानात्मक दायित्व असणार आहे.
‘सनातन धर्म हा राष्ट्रीय धर्म आहे’, असे म्हणतांना ‘सनातन धर्माप्रमाणे राष्ट्र चालवणे’, हे शासनकर्त्यांचे दायित्व होते. जेव्हा आपण ‘राष्ट्राचा धर्म ‘सनातन धर्म’ आहे’, असे म्हणतो, तेव्हा समाजातील सर्व क्षेत्रांमध्ये तशी धर्माधिष्ठित म्हणजे नीतीनियमांनी युक्त अशी आदर्श व्यवस्था निर्माण होणे अपेक्षित आहे. राष्ट्राची सद्यःस्थिती भ्रष्टाचारी, गुन्हेगारी, स्त्रियांसाठी असुरक्षित, तसेच पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे चंगळवादी आणि ‘जगण्याचे धर्माधारित ध्येय विसरून अर्थार्जनी झालेला समाज’, अशी आहे. धर्माधारित राष्ट्र चालवून राष्ट्राची वरील दुःस्थिती पालटेल, तेव्हा खर्या अर्थाने त्या राष्ट्राचा धर्म ‘सनातन’ म्हणून अभिमानाने मिरवण्यात समाधान असेल. अर्थात् हे होण्यासाठी, म्हणजेच समाज आदर्शवत् होण्यासाठी सनातन धर्माच्या मूल्यांचे अभिसरण समाजात झपाट्याने मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे. यामध्ये त्याग, संयम, शिस्त, नियमांचे काटेकोर पालन, कठोर शासन करणे आदी गुणांनी युक्त शासन, प्रशासन आणि प्रजा निर्माण होणे अपेक्षित आहे. ते होण्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेश राज्यात काही प्रमाणात आरंभ केला आहे, तसा तो राष्ट्रभर होणे अपेक्षित आहे. आज कैराना, कन्याकुमारी, काश्मीर आदी ठिकाणांहून हिंदूंचे विस्थापन होत असतांना, तसेच हिंदु मुली, हिंदूंची भूमी, हिंदूंची मंदिरे, हिंदूंचे गोधन, हिंदू नेते आदी काहीच सुरक्षित नसतांना या सार्यांपासून वाचण्यासाठी आता सनातन धर्मीय (हिंदु) राष्ट्राची आवश्यकता हिंदूंना वाटली, तर त्यात चुकीचे काय ? या सार्यांतून हिंदूंना लवकरात लवकर आश्वासक उपाय कसे मिळतील ? याची प्रतीक्षा आहे. हिंदु राष्ट्र म्हणत असतांना या समस्यांपासून मुक्ती देणार्या एका आदर्श व्यवस्थेची सिद्धता आणि कार्यवाही होण्याच्या दिशेने पावले उचलणे आता हिंदूंना अपेक्षित आहे !
हिंदूंचे अस्तित्व आणि सुरक्षा यांच्या दृष्टीकोनातून हिंदु राष्ट्राच्या व्यवस्थेची हिंदूंना प्रतीक्षा आहे ! |