गोवा पर्यटन खात्याकडून नव्याने मार्गदर्शक सूचना प्रसारित

पर्यटकाच्या संमतीविना त्यांची ‘सेल्फी’ न घेण्याचा नियम

पणजी, २७ जानेवारी (वार्ता.) – गोवा पर्यटन खात्याने पर्यटक उद्योगाला भेडसावणार्‍या विविध समस्यांवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने नव्याने मार्गदर्शक सूचना प्रसारित केल्या आहेत. राज्यात पर्यटनाच्या नावावर अनैतिक धंदे, पर्यटकांची लुबाडणूक होऊ नये यासाठी, तसेच काळानुरूप पर्यटन व्यवसायात शिरलेल्या विकृती दूर सारण्यासाठी ही अद्ययावत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे. यामध्ये ‘पर्यटक किंवा कोणत्याही अनोळखी व्यक्तीचा तो विशेषत: अंगावर सूर्याचे ऊन घेत असतांना (सनबाथ) किंवा पाण्यात आंघोळ करतांना त्याच्या संमतीविना ‘सेल्फी’ घेऊ नये, असे म्हटले आहे. पर्यटक किंवा अनोळखी व्यक्ती यांच्या  खासगी जीवन जगण्याच्या कृतींचा सन्मान राखण्यासाठी हे सूत्र मार्गदर्शन तत्त्वात समाविष्ट करण्यात आले आहे.

मार्गदर्शक तत्त्वांमध्ये पुढील सूत्रांचाही समावेश आहे –

१. समुद्रकिनार्‍यांवरील मोठे दगड आदी ठिकाणी ‘सेल्फी’ घेणे टाळावे.
२. वारसा स्थळाला हानी पोचेल अशी कोणतीही कृती करू नये.
३. अवैध खासगी टॅक्सी भाडेतत्त्वावर घेऊ नये.
४. भरमसाठ भाडे आकारले जाऊ नये, यासाठी टॅक्सीचालकाला ‘मीटर’वर आधारित भाडे आकारण्यास सांगावे.
५. पर्यटकांनी पर्यटन खात्याकडे नोंद असलेल्या हॉटेलमध्येच खोलीचे आरक्षण करावे.
६. समुद्रकिनारा किंवा सार्वजनिक जागा या ठिकाणी मद्यपान करण्यास बंदी आहे आणि तो गुन्हा ठरणार आहे.
७. नोंदणी नसलेल्या दलालाकडून बोटसफरीची किंवा अन्य पर्यटन सुविधांची तिकिटे घेऊ नयेत.
८. उघड्यावर जेवण बनवणे हा गुन्हा आहे आणि यामध्ये ५० सहस्र रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो.
९. राज्यात पर्यटनस्थळाच्या ठिकाणी भीक मागण्यास बंदी आहे. त्यामुळे भिकार्‍यांना पर्यटकांनी प्रोत्साहन देऊ नये.