सिंधुदुर्ग : कुडाळ येथे होणार्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा लहान मुलांकडून प्रचार
कुडाळ – येथील कुडाळ हायस्कूलच्या पटांगणात २९ जानेवारी या दिवशी सायंकाळी ५ वाजता हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जाहीर हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेचा विविध माध्यमांतून प्रचार करण्यात येत आहे. २५ आणि २६ जानेवारी या दिवशी लहान मुलांनी ‘महान संस्कृती दर्शन कक्षा’च्या माध्यमातून राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांच्या व्यक्तीरेखा साकारून विविध ठिकाणी प्रचार केला.
२५ जानेवारी या दिवशी श्री गणेश जयंतीच्या निमित्ताने कुडाळ शहर आणि परिसरातील श्री गणेश मंदिरांच्या ठिकाणी, तसेच २६ जानेवारी या दिवशी कसाल आणि कुडाळ येथे लहान मुलांनी प्रचार केला. यामध्ये कु. आदित्य वाघमारे आणि कु. भाग्येश कोपदार यांनी ‘नेताजी सुभाषचंद्र बोस’, कु. हर्षवर्धीनी सामंत आणि कु. भक्ती टोपकर यांनी ‘राजमाता जिजाबाई’, कु. राधिका पाटील आणि कु. जीविका घाग यांनी ‘रणरागिणी झाशीची राणी’, कु. तेजस्वी साळसकर आणि कु. कृष्णाली बागवडे यांनी ‘कित्तूरची राणी चन्नम्मा’, कु. भक्तराज टोपकर आणि कु. पार्थ सामंत यांनी ‘बालवीर शिरीषकुमार’ आणि कु. स्वरूप चिऊलकर याने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यांची व्यक्तीरेखा साकारली होती. कसाल बसस्थानकानजीक रिक्शा चालक-मालक संघटना आयोजित श्री सत्यनारायण पूजेच्या ठिकाणी प्रचार करण्यास अनुमती देण्यात आली.
क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांची व्यक्तीरेखा साकारणार्या या मुलांनी ‘भारताची सद्य:स्थिती पाहून राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांना काय वाटले असते ?’, ‘मुलांना भारताचे आदर्श नागरिक आणि देशाचे भावी आधारस्तंभ म्हणून घडवण्यासाठी काय प्रयत्न करणार आहात ?’, असे हिंदूंना जागृत करणारे विविध प्रश्न विचारले, तसेच या हिंदु राष्ट्र-जागृती सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहनही केले.
लहान मुलांचे राष्ट्र आणि धर्म जागृतीचे प्रयत्न पाहून अनेकांनी त्यांचे कौतुक केले आणि काही ठिकाणी बक्षीसही दिले.