पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे जगामध्ये भारताचा सन्मान वाढला ! – गणेश नाईक, आमदार
नवी मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे जगामध्ये भारताचा सन्मान वाढला असून सामर्थ्यवान पिढी घडत असल्याचे चित्र देशात दिसत आहे, असे प्रतिपादन भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी वाशी येथे केले.
पंतप्रधान मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या उपक्रमांतर्गत ऐरोली विधानसभा क्षेत्रामध्ये ‘श्री गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने ‘एक्झाम वॉरियर्स’ भव्य चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत १० सहस्र विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. या वेळी ते बोलत होते. ‘श्री गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट’चे अध्यक्ष डॉ. संजीव नाईक यांनी सांगितले की, पंतप्रधानांनी अतिशय खडतर परिस्थितीमध्ये स्वत:चे शिक्षण पूर्ण केले; परंतु देशातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, याची काळजी ते घेत आहेत. ‘परीक्षा पे चर्चा’ या उपक्रमांतर्गत पंतप्रधान विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या मनात आत्मविश्वासाची पेरणी करत असतात. पंतप्रधानांनी लिहिलेल्या ‘एक्झाम वॉरियर’ या पुस्तकाचे विद्यार्थ्यांनी आवर्जून वाचन करावे, असे आवाहन नाईक यांनी या प्रसंगी केले.