चीन विरुद्धच्या आर्थिक युद्धात भारत पिछाडीवर !
‘मल्टीडोमेन वॉर’ हे अप्रतिबंधित युद्ध किंवा कुठलेही नियम नसलेले युद्ध किंवा ‘हायब्रीड वॉर’ किंवा ‘ग्रे झोन वॉर’ यांचे मिश्रण आहे. हे युद्ध संपर्क नसलेले असते. चीन हे युद्ध भारताविरोधात वर्षातील ३६५ दिवस आणि २४ घंटे लढत आहे. याची व्याप्ती प्रचंड आहे. तो हे युद्ध सीमेवर नाही, तर भारताच्या आत विविध आघाड्यांवर एकाच वेळी लढत आहे. यात भारतीय सैन्य आहेच; पण केंद्र सरकार, विविध राज्य सरकारे, सर्व देशांच्या संस्था आणि भारतीय नागरिकही सहभागी आहेत. या युद्धाचे अनेक प्रकार आहेत. या लेखामध्ये ‘भारताविरुद्ध चीनचे आर्थिक युद्ध आणि त्याची भारताच्या अर्थव्यवस्थेतील आर्थिक घुसखोरी, तसेच हे युद्ध चीनच्या विरोधात लढायचे असेल, तर भारतियांनी नेमके काय केले पाहिजे ?’, हे पाहूया.
१. वर्ष २०२२ मध्ये आर्थिक आणि व्यापारी युद्धांत चीनकडून भारताचा पराभव
‘प्रत्येक भारतियाने चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला पाहिजे’, असे आपण नेहमी म्हणतो; परंतु त्यादृष्टीने कार्यवाही होत नाही. भारतीय नेहमी चीनच्या विरोधात लढण्याऐवजी एकमेकांशी लढण्यात गर्क असतात. त्यामुळे देशाची प्रगती ज्या वेगाने व्हायला पाहिजे, त्या वेगाने होत नाही. एकीकडे आपण ‘चिनी वस्तू खरेदी करू नये’, असे म्हणतो; पण आताच आलेल्या वर्तमानपत्रातील बातमीनुसार चीनकडून होणारी आयात प्रचंड वाढलेली आहे, तसेच आयात आणि निर्यात यांच्यातील तफावत जवळपास १०० अब्ज डॉलर्स (८३ सहस्र कोटी रुपये) एवढी आहे. याचा अर्थ चीनकडून होणारी आयात अल्प होण्याएवजी दिवसेंदिवस वाढतच आहे. याला चीनकडून स्वस्तात वस्तू घेऊन मोठा लाभ कमावणारे भारतीय व्यापारी उत्तरदायी आहेत.
दुसरे भारतीय उद्योगजगताला वाटते की, ते चीनखेरीज जिवंतच राहू शकत नाहीत. थोडक्यात वर्ष २०२२ या वर्षात आर्थिक आणि व्यापारी युद्धात चीनने भारताला हरवले आहे. त्यामुळे हे आर्थिक आणि व्यापारी युद्ध जिंकायचे असेल, तर त्यासाठी काही उपाययोजना करणे आवश्यक आहे.
२. चीनशी अवैध व्यापार करणार्या भारतीय व्यापार्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !
भारत चीनकडून कच्चा माल आयात करतो. तो घ्यायला हरकत नाही; परंतु या मालाची भारतातच निर्मिती केल्यास अधिक चांगले राहील. उदा. औषधी उद्योगासाठी लागणारा ‘एपीआय’ हा कच्चा माल भारतातच निर्माण करायला पाहिजे. याखेरीज भारत अन्य देशांकडून अशा प्रकारच्या कच्चा मालाची आयात करून चीनवरील अवलंबित्व न्यून करू शकतो.
चीनकडून भारतात अवैध व्यापार चालतो. तो भारताची शेजारी राष्ट्रे असलेल्या नेपाळ, बांगलादेश आणि म्यानमार यांच्या सीमांमधून पुष्कळ गोष्टींची तस्करी करतो. या माध्यमातून देशात बनावट (खोट्या) नोटा, अफू, गांजा, चरस हे आणले जाते. चीनच्या या अवैध व्यापाराविषयी मी अनेक वेळा बोललो आहे. मला येथे असे सांगायचे आहे की, चिनी चलन युआनचे मूल्य १ रुपयाला १२ रुपये एवढे आहे. भारताने चीनकडून कच्चा माल न घेता दुसर्या देशाकडून घेतला, तर रुपयाची शक्ती वाढेल. भारतीय व्यापारी चिनी युआन काळ्या बाजारातून विकत घेतात. एखाद्या चिनी कंटेनरमधून येणार्या मालाची किंमत १० कोटी असेल; पण देयकावर त्याची किंमत १ कोटी दाखवली जाते. याचा अर्थ ९ कोटी रुपयांचा माल कुठलाही कर न लागता भारतात आणला जातो. त्यामुळे चिनी मालाची किंमत फार अल्प होते आणि भारतीय व्यापार्यांना मोठा लाभ होतो. आता बातमी आली की, भारताचा अन्वेषण विभाग अशा प्रकारच्या व्यापारावर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे अशा प्रकारे अवैध व्यापार करणार्या भारतीय व्यापार्यांना पकडले जाईल, अशी आशा आहे.
३. चीनचे व्यापारी युद्ध जिंकण्यासाठी भारताने करावयाचे प्रयत्न
भारतीय व्यापार्यांना त्वरित श्रीमंत होण्याचे वेड लागलेले आहे. त्यासाठी ते चीनमधून वाटेल त्या गोष्टी आयात करून त्यांची भारतात विक्री करतात. भारताने चीनकडून होणारी आयात न्यून करावी. यासमवेतच चीनशी अवैध व्यापार करणार्या व्यापार्यांना कठोर शिक्षा केली पाहिजे. त्यासाठी भारताला नेपाळ आणि बांगलादेश यांच्या सीमा बंद कराव्या लागतील. एवढेच नाही, तर समुद्र किनार्यावरून मोठ्या प्रमाणात होणारी तस्करीही थांबवावी लागेल. त्यासाठी भारतियांमध्ये राष्ट्र कल्याणाची एक दुर्दम्य इच्छाशक्ती निर्माण करावी लागेल. चीनचा खराब माल अनेक विदेशी आस्थापने घेत नाहीत. त्यावर भारतानेही बंदी घातली पाहिजे. भारताला आर्थिक आणि व्यापारी युद्ध जिंकायचे असेल, तर भारताला सर्व गोष्टी भारतात निर्माण कराव्या लागतील. यासाठी भारतातील लघू आणि मध्यम दर्जाच्या उद्योगांना मोठ्या प्रमाणात पुढे आणावे लागेल. चिनी वस्तू तेथील स्त्रिया घरी बनवतात. त्यामुळे त्यांची किंमत अल्प असते. चिनी कामगारांचे कौशल्यही पुष्कळ अधिक आहे. असे कौशल्य भारतालाही वाढवावे लागेल आणि लघू उद्योगाचे एक जाळे भारताला निर्माण करावे लागेल. त्यामुळे भारताला चीनशी लढाई जिंकता येईल.
४. चीन विरोधातील युद्ध जिंकण्यासाठी भारतियांनी चिनी नागरिकांहून अधिक कार्यक्षम बनणे आवश्यक !
भारताच्या अर्थव्यस्थेमध्ये खिळ घालण्यासाठी चीन विविध राजकीय पक्ष, संघटना, संस्था आणि गुन्हेगार यांचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग करून घेतो. हे लोक निदर्शने करणे, संप पुकारणे, रस्ते बंद करणे, सार्वजनिक मालमत्तेची जाळपोळ करणे, रस्त्यावर वाहनांची तोडफोड करायची, अशा कामात गुंतलेले आहेत. काही राजकीय पक्ष आणि संस्था यांना वाटते की, बंद पुकारणे हा त्यांचा अधिकार आहे. जर राजकीय पक्षांमध्ये विविध विषयांवर मतभेद असू शकतील; परंतु ते अन्य माध्यामातून दाखवता येतील. त्यासाठी बंद पुकारणे हा मार्ग नाही. भारताची अर्थव्यवस्था थांबवण्यापेक्षा तिचा वेग वाढवून विरोध दर्शवू शकतो.
यात माध्यमांचे काम अतिशय महत्त्वाचे आहे. त्यांनी हिंसाचार, तोडफोड यांपेक्षा चांगल्या कामाला प्रसिद्धी दिली पाहिजे. त्यांच्याकडून अनेकदा हिंसाचाराला ठळक प्रसिद्धी मिळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे चीन विरोधातील युद्ध जिंकायचे असेल, तर भारतियांना चिन्यांपेक्षा अधिक कार्यक्षम होण्याची आवश्यकता आहे. चीनमध्ये हिंसाचार आणि बंद केल्या जात नाही. ते केवळ काम करतात. त्यामुळे चीन जगातील दुसर्या क्रमांकाची आर्थिक शक्ती बनली आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांनी प्रत्येक क्षेत्रात जागतिक दर्जाचे किंवा चिनी नागरिकांहून अधिक कार्यक्षम बनणे आवश्यक आहे. यासाठी प्रखर राष्ट्रीय इच्छाशक्तीची आवश्यकता आहे.’
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.