श्री गौड ब्राह्मण समाजाच्या जातपंचायतीतील पंचांच्या विरोधात गुन्हा नोंद !
आंतरजातीय विवाह केल्यामुळे कुटुंबाला बहिष्कृत केल्याची घटना उघड !
पुणे – आंतरजातीय विवाह केल्यामुळे एका कुटुंबाला २३ वर्षांपूर्वी जातपंचायतीने बहिष्कृत केल्याचा प्रकार उघड झाला आहे, तसेच कुटुंबाला समाजात परत घेण्यासाठी सव्वा लाख रुपये दंड मागितल्याप्रकरणी श्री गौड ब्राह्मण समाजाच्या जातपंचायतीतील पंचांसह ८ जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी प्रकाश डांगी यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. डांगी श्री गौड ब्राह्मण समाजातील असून ते रिक्शाचालक आहेत. वर्ष १९९८ मध्ये त्यांनी आंतरजातीय विवाह केला होता. त्यामुळे त्यांना समाजातून बहिष्कृत केले होते. समाजातील प्रत्येक कार्यक्रमापासून डांगी यांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले होते. समाजात पुन्हा यायचे असल्यास १ लाख २५ सहस्र रुपयांची त्यांच्याकडे मागणी केली होती. वर्ष २०१६ च्या ‘सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायद्या‘चे कलम ६ आणि ७ अन्वये, तसेच भारतीय दंड संहिता कलम ३४ अन्वये पंचांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
संपादकीय भूमिकासमाजातून बहिष्कृत करण्याचे प्रकार या काळातही घडणे, हे समाज व्यवस्थेसाठी लज्जास्पद आहे ! |