भंडारा येथे ‘पठाण’ चित्रपटाच्या विरुद्ध हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निदर्शने !
चित्रपटगृहाच्या बाहेर घोषणाबाजी करत चित्रपटाचे फलक जाळले !
नागपूर – भंडारा शहरातील आदर्श चित्रपटगृहात २५ जानेवारी या दिवशी पठाण चित्रपट प्रदर्शित झाला. येथील गांधी चौक येथील आदर्श चित्रपटागृहासमोर भंडारा येथील बजरंग दल, विश्व हिंदु परिषद, हिंदु जागरण मंच, हिंदु रक्षा मंच, भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी चित्रपटाच्या विरोधात घोषणा देत निदर्शने केली. या वेळी कार्यकर्त्यांनी पठाण चित्रपटाचे फलक जाळले आणि अभिनेता शाहरूख खान याच्या छायाचित्रावर काळी शाई फेकून निषेध नोंदवला. पठाण चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्याने हा चित्रपट वादाच्या भोवर्यात सापडला आहे. या गाण्याला कडाडून विरोध करण्यात आला आहे. या गाण्यातील दीपिका पदुकोण हिच्या कपड्यांवर आक्षेप घेण्यात आला आहे. सामाजिक माध्यमांवर काहींनी पठाण चित्रपटाला समर्थन दिले आहे, तर काहींनी जोरदार विरोध केला आहे.