रेठरे बुद्रुक (तालुका कराड) या ठिकाणी अनधिकृत मशिदीचे बांधकाम काढण्यासाठी ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर ग्रामपंचायतीची नोटीस !
कराड, २७ जानेवारी (वार्ता.) – येथील रेठरे बुद्रुक या गावामध्ये सिकंदर दगडू शिकलगार या व्यक्तीने स्वतःच्या मिळकतीमध्ये केलेले अनधिकृत मशिदीचे बांधकाम त्वरित काढण्यासाठी रेठरे ग्रामपंचायतीने त्यास नोटीस दिली आहे. धार्मिकस्थळांच्या बांधकामासाठी शासनाच्या विविध विभागांची अनुमती न घेताच शिकलगार यांनी अनधिकृत मशिदीचे बांधकाम चालू केले होते. याविषयी ग्रामस्थांनी तक्रारीचे अर्ज ग्रामपंचायतीस दिल्यानंतर ग्रामपंचायतीने प्रत्यक्ष पहाणी केली असता त्या ठिकाणी मशिदीसाठीचे प्राथमिक बांधकाम चालू असल्याचे निदर्शनास आले. (अनधिकृत मशिदीचे बांधकाम चालू आहे, हे स्वतःहून ग्रामपंचायतीच्या लक्षात कसे आले नाही ? यासाठी ग्रामस्थांना तक्रार का करावी लागते ? यातून ग्रामपंचायतीचा शिकलगार यांना पाठिंबा आहे, असे म्हणायचे ! – संपादक)
या घटनेनंतर १४ जानेवारी या दिवशी शिकलगार यांना मशिदीच्या बांधकामासाठी त्यांनी कोणकोणत्या अनुमती घेतलेल्या आहेत ? याचा ७ दिवसांच्या आत लेखी खुलासा करण्याविषयी ग्रामपंचायतीच्या वतीने नोटीस देण्यात आली होती. यानंतर पुन्हा २५ जानेवारी या दिवशी सरपंच आणि गटविकास अधिकारी यांच्या स्वाक्षरीने शिकलगार यांना पूर्व अनुमतीविना केलेले अनधिकृत मशिदीचे बांधकाम त्वरित काढून टाकावे, अन्यथा ग्रामपंचायतीच्या वतीने हेे बांधकाम काढण्यात येऊन त्याचा खर्च वसूल करण्यात येईल, तसेच एम्.आर्.टी.पी. कायद्यान्वये कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पत्राद्वारे कळवण्यात आले आहे.