‘स्मार्ट सिटी’ योजनेतून सोलापूर महापालिकेच्या इंद्रभुवन इमारतीच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण !
सोलापूर, २७ जानेवारी (वार्ता.) – ‘स्मार्ट सिटी’ योजनेतून महापालिकेच्या इंद्रभुवन इमारतीचे ११० वर्षांनंतर मूळ रूपात सुशोभीकरण आणि पुढील २०० वर्षांसाठी मजबुतीकरण करण्यात आले आहे. मागील ९ मासांपासून या ऐतिहासिक वास्तूचे सुशोभीकरणाचे काम चालू होते. प्रजासत्ताकदिनाच्या दिवशी ही इमारत नागरिकांसाठी खुली करण्यात आली असून सकाळी ७.३० वाजता महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी महापालिकेतील पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इंद्रभुवन ही हेरिटेज (पुरातन) वास्तू आहे. वर्ष १८९९ मध्ये उद्योजक पुण्यश्लोक आप्पासाहेब तथा मलप्पा वारद यांनी या इमारतीचे बांधकाम चालू केले. व्हिक्टोरियन स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असलेली ही इमारत सोलापूरचे वैभव आहे. हेरिटेज वास्तूंच्या संवर्धनासाठी या इमारतीला मूळ रूप यावे यासाठी ‘स्मार्ट सिटी’ योजनेतून ५ कोटी रुपये व्यय करण्यात आले आहेत. इंद्रभुवन इमारतीचे वर्ष १९६४ मध्ये नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाले आहे.