शिळे अन्न खाणे का आणि कसे टाळावे ?
‘जे अन्न एक दिवसापूर्वी शिजवलेले असते आणि त्यावर रात्र उलटून गेली की, दुसर्या दिवशी त्याला ‘शिळे अन्न’ असे म्हणतात. असे अन्न खाल्ल्याने अजीर्ण, अम्लपित्त, पोट फुगणे, वायू होणे, बद्धकोष्ठता, उत्साह हानी असे अनेक विकार होतांना दिसतात. अन्नपचनाशी संबंधित असे त्रास होऊ द्यायचे नसल्यास पुढील प्रकारे काळजी घ्यायला हवी.
रात्री अन्न अधिक प्रमाणात शिजवू नये. रात्री जरा अल्प खाणे झाले तरी चालू शकेल; पण आवश्यक तेवढेच अन्न शिजवल्याने दुसर्या दिवसापर्यंत ते उरणार नाही. तसेच ते वाया जाऊ नये; म्हणून दुसर्या दिवशी ते शिळे अन्न खावे लागणार नाही.
सध्याच्या अतिजलद जीवनशैलीमध्ये अनेक गृहिणींना सकाळी पोळ्या करण्यासाठी पीठ भिजवण्यास वेळ नसतो; म्हणून त्या रात्रीच पीठ भिजवून ती कणिक शीतकपाटामध्ये अनेक दिवस ठेवतात आणि मग आवश्यकतेनुसार त्याच्या पोळ्या करतात.
अशा प्रकारचे हे शिळे अन्न हे पितृदोष निर्माण करणारे असते. वैज्ञानिकदृष्ट्या शिळे अन्न हे जंतूंची निर्मिती करणारे आणि पचनक्षमता मंदावणारे असे असते. त्यामुळे वरीलप्रमाणे शीतकपाटामध्ये ठेवलेल्या शिळ्या कणिकेच्या पोळ्या न खाता प्रतिदिन पीठ भिजवून त्याच्यापासून बनवलेल्या ताज्या पोळ्या खाव्यात.
या संदर्भातील मध्यम मार्ग म्हणजे दुसर्या दिवशी पोळ्या करण्यासाठीची पूर्वसिद्धता म्हणून तत्पूर्वी रात्री पीठ, मीठ आणि तेल आवश्यकतेनुसार मोजून एकत्र करून ठेवावे. दुसर्या दिवशी त्या मिश्रणात केवळ पाणी घालून कणिक भिजवावी आणि त्याच्या पोळ्या कराव्यात.
अशा प्रकारे शिळे अन्न खाणे टाळून आरोग्य जपावे !’
– वैद्य समीर मुकुंद परांजपे, खेर्डी, दापोली, रत्नागिरी. (१२.१.२०२३)