हिंदूंनी धर्मासाठी वेळ देण्याची आवश्यकता ! – अनंत विभूषित महामंडलेश्वर स्वामी ऋषिराजजी महाराज
सांगोला (जिल्हा सोलापूर), २६ जानेवारी (वार्ता.) – अन्य धर्मीय स्वत:च्या धर्माची जागृती करण्यासाठी, तसेच त्यांच्या उपासनेसाठी वेळ देतात. ते कधीही ‘उपासनेला वेळ दिल्यास व्यवहारात हानी होईल’, असा विचार करत नाहीत; मात्र हिंदु बांधव माझे घर, माझे दुकान यांमुळे ‘धर्मासाठी वेळ नाही’, अशी कारणे सांगतात. हिंदूंनी संघटित होऊन धर्म आणि उपासना यांसाठी वेळ दिला, तरच धर्मावरील आघात रोखले जाऊ शकतात, असे स्पष्ट मत गोवर्धन मथुराचे श्री श्री १००८ अनंत महामंडलेश्वर स्वामी ऋषिराजजी महाराज यांनी व्यक्त केले.
स्वामी ऋषिराजजी महाराज सांगोला येथील गोवा स्टील सेंटरचे मालक भीमारामजी चौधरी यांच्या निवासस्थानी आशीर्वाद देण्यासाठी आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष पाटणे यांनी त्यांचे दर्शन घेऊन समितीच्या कार्यासाठी आशीर्वाद घेतले. त्या वेळी ते बोलत होते. महाराज पुढे म्हणाले, ‘‘आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचेे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानायला हवेत. त्यांनी राष्ट्र आणि धर्म यांविरोधातील आतंकवाद संपवण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत.’’ या वेळी श्री राजाराम आँजणा मंडल सांगोलाचे अध्यक्ष श्री. जीवाराम पटेल, उपाध्यक्ष लक्ष्मणभाई पटेल, तसेच ट्रस्टचे समस्त सदस्य आणि सकल समाजबांधव उपस्थित होते. या वेळी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.