शनिशिंगणापूर येथील शनीदेवाला १ कोटी रुपयांचा सोन्याचा कलश अर्पण !
नगर – ओडिशामधील एका भक्ताने शनी अमावास्येच्या निमित्ताने शनिशिंगणापूर येथील शनिदेवाला १ कोटी रुपयांचा कलश अर्पण केला आहे. हा कलश १ किलो ७०० ग्रॅम सोने आणि ५ किलो चांदी वापरून बनवला आहे; मात्र या भक्ताने आपले नाव जाहीर न करण्याची विनंती देवस्थान प्रशासनाला केली आहे. सायंकाळच्या आरतीनंतर हा स्वर्णकलश मूर्तीसमोर विधीपूर्वक अर्पण करण्यात आला. सदर भाविकाने हे गुप्तदान केले आहे. अनेक वर्षानंतर आलेल्या पौष शनि अमावास्येच्या निमित्ताने शनिवारी दिवसभर आणि रविवारी पहाटेपर्यंत देशभरातून लाखोंच्या संख्येने शनीभक्त शनिशिंगणापूरमध्ये आले होते.
सोनई येथील भळगट ज्वेलर्सचे संचालक आनंद भळगट यांनी हा कलश सिद्ध केला आहे. या कलशावर ‘श्री शनेश्वराय नमः ।’ कोरण्यात आले असून यावर शनिदेवाचे मंत्रही कोरण्यात आले आहेत. या सुवर्णकलशात ९ लिटर तेल बसणार आहे. आजपर्यंतच्या दानात सर्वाधिक मोठे दान या कलशाचे आहे.