मंत्रालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी विखारी लिखाण असलेल्या पुस्तकांची उघडपणे विक्री !
संघाला राष्ट्रविरोधी आणि मुसलमानद्वेषी दाखवण्याचा अश्लाघ्य प्रयत्न, तसेच हिटलरशी केली तुलना !
मुंबई, २६ जानेवारी (वार्ता.) – मंत्रालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी अत्यंत खोटे आणि विखारी लिखाण असलेल्या पुस्तकांची विक्री उघडपणे करण्यात आली. या पुस्तकांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राष्ट्रविरोधी आणि मुसलमानद्वेषी दाखवणारे लिखाण करण्यात आले असून हिंदु राष्ट्राची तुलना इस्लामी आतंकवाद्यांशी केली आहे. २३ ते २५ जानेवारी या कालावधीत मराठी भाषा विभागाकडून या पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
यांमध्ये ‘आर्.एस्.एस्.चा राष्ट्रविघातक प्रवास’, ‘आर्.एस्.एस्.ला ओळखा’, ‘संघाचा असली चेहरा’ आदी पुस्तकांचा समावेश आहे. ‘आर्.एस्.एस्.चा राष्ट्रविघातक प्रवास’ आणि ‘आर्.एस्.एस्.ला ओळखा’ ही पुस्तके शमसूल इस्लाम या व्यक्तीची असून ‘संघाचा असली चेहरा’ हे पुस्तक समाजवादी नेते भाई वैद्य यांचे आहे.
‘आर्.एस्.एस्.चा राष्ट्रविघातक प्रवास’ पुस्तकातील आक्षेपार्ह भाग !
१. अल्पसंख्यांकांविरुद्ध समाजात तिरस्कार-मोहीम चालवणे, हे संघाचे प्रमुख कर्तव्य होते. (पृष्ठ क्र. १३)
२. गोळवलकरांची अशी इच्छा होती की, भारतीय जनतेने अमानवी ब्रिटीश सरकारच्या कठोर आणि दडपणूक करणार्या कायद्यांचा सन्मान करावा. (पृष्ठ क्र. १६)
३. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात अत्यंत विश्वासघातकी भूमिका पार पाडलेली संघटना म्हणून ‘आर्.एस्.एस्.’कडे पहाता येईल. ब्रिटिशांच्या साम्राज्यवादाच्या विरोधात भारतीय जनतेच्या एकजुटीने चालू असलेल्या स्वातंत्र्य चळवळीला आपल्या टोकाच्या अतिरेकी स्वरूपाच्या हिंदु राष्ट्राच्या घोषणेने सातत्याने खीळ घालणे, एवढा एकमेव अतिमहत्त्वाचा सहभाग संघाने भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत घेतला. (पृष्ठ क्र. १८)
४. भगतसिंग, आझाद आणि अशफाक उल्लाह यांच्यासारख्या क्रांतीकारकांच्या नेतृत्वाखाली चालू असलेल्या चळवळीची कुचेष्टा करण्यातही संघाला संकोच वाटला नाही. (पृष्ठ क्र. १९)
५. आर्.एस.एस्.च्या कार्यकर्त्यांनी अलीकडेच गुजरातमध्ये मुसलमानांचे अत्यंत सावधगिरीने हत्याकांड करून स्वत:चा उद्देश प्रत्यक्षात साकारला नाही का ? (पृष्ठ क्र. २४)
६. आर्.एस.एस्.चे महान तत्त्वज्ञ गोळवलकर यांनी बेधडकपणे हिटलरच्या हुकूमशाही आणि फॅसिस्ट रचनेवर आधारित हिंदु राष्ट्राची निर्मिती करण्याचे ठरवले. (पृष्ठ क्र.३०)
वरीलप्रमाणे या पुस्तकामध्ये ‘स्वातंत्र्यचळवळीशी विश्वासघात’, ‘हिटलर आणि मुसोलिनी हेच गुरु’ अशा लेखांद्वारे खोटे लिखाण करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ‘ब्रिटीशधार्जिणे’ असल्याचा भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
‘आर्.एस्.एस्.ला ओळखा’ या पुस्तकातील आक्षेपार्ह लिखाण !
१. भारताचा राष्ट्रध्वज, राज्यघटना आणि लोकशाही-धर्मनिरपेक्षता यांसारख्या राष्ट्रीय मूल्यांवर ‘आर्.एस्.एस्.’ची निष्ठा नाही आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्याशी तिचे काहीही देणे-घेणे नाही. (पृष्ठ क्र. ४)
२. आर्.एस्.एस्. ही मुस्लिम लीगच्या मार्गावरून वाटचाल करू लागली आहे. (पृष्ठ क्र. ५)
३. भारतमातेसाठी सर्वस्वाची होळी करणार्यांकडे गोळवलकर हीन दृष्टीने पहात होते. (पृष्ठ क्र. १२)
४. आर्.एस्.एस्.च्या राष्ट्रविरोधी विचारांची देशाच्या जनतेला माहिती करून देणे, ही आजच्या राष्ट्रभक्तीची पायाभूत निकड आहे. षड्यंत्रकारी शैलीने संपूर्ण भारतीय राज्य आणि समाज यांना उद़्ध्वस्त करण्यासाठी ती कार्यरत आहे. (पृष्ठ क्र. २८)
‘संघाचा असली चेहरा’ यातील आक्षेपार्ह लिखाण !
१. रा.स्व. संघ हा भारतातील हिटलरचा शिष्योत्तम आहे. (पृष्ठ क्र. १२)
२. संघाला हिंसा निषिद्ध नव्हती. किंबहुना त्याचे पद्धतशीर शिक्षण संघ स्वयंसेवकांना दिले जात असते. (पृष्ठ क्र. १३)
३. भारतीय संस्कृती नष्ट झाली, देशाचे तुकडे पडले, तरीही संघ परिवार त्याची यत्किंचितही पर्वा करणार नाही. हिंदु राष्ट्राचे स्वप्न साकार झाल्याचे पहाण्याची त्यांना घाई झालेली आहे.
संपादकीय भूमिकाराष्ट्रवादी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनेला ‘राष्ट्रविरोधी’ रेखाटणे, हा वैचारिक आतंकवाद होय. महाराष्ट्रात हिंदुत्वनिष्ठ सरकार सत्तेवर असतांना मंत्रालयात लावण्यात येणार्या ग्रंथप्रदर्शनांमध्ये अशी हिंदु संघटनांची नाहक अपकीर्ती करणार्या पुस्तकांची विक्री होणे हिंदूंना अपेक्षित नाही. यास उत्तरदायी असणार्यांवर सरकारने कारवाई करावी, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे ! |