सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय प्रादेशिक भाषांमध्ये २६ जानेवारीपासून झाले उपलब्ध !

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय विविध भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये देण्याच्या सेवेचा प्रारंभ करण्यात आला आहे. २६ जानेवारी, म्हणजेच प्रजासत्ताकदिनापासून हे निकाल प्रादेशिक भाषांत मिळण्यास प्रारंभ झाला आहे.

२५ जानेवारीला सरन्यायाधिशांनी न्यायालयात कामकाज प्रारंभ होण्यापूर्वी अधिवक्त्यांना सांगितले की, सर्वोच्च न्यायालय ‘इलेक्ट्रॉनिक सर्वोच्च न्यायालय अहवाल’ (ई-एस्.सी.आर्.) प्रकल्पाचा एक भाग म्हणून सरकारी सूचीमधील भारतीय भाषांमध्ये  सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे उपलब्ध करून देण्याची विनामूल्य सेवा २६ जानेवारीपासून कार्यान्वित करेल. ‘ई-एस्.सी.आर्.’ प्रकल्पात सध्या सुमारे ३४ सहस्र निर्णय उपलब्ध आहेत. हे नेमके निकाल शोधण्याचीही सुविधा यात आहे. यांपैकी प्रादेशिक भाषांत १ सहस्र ९१ निवाडे उपलब्ध आहेत. ते प्रजासत्ताकदिनाच्या दिवशी सार्वजनिकरित्या उपलब्ध करून देण्यात येतील. उडिया भाषेत २१, मराठीमध्ये १४, आसामीमध्ये ४, कन्नडमध्ये १७, मल्याळममध्ये २९, नेपाळीमध्ये ३, पंजाबीमध्ये ४, तमिळमध्ये ५२, तेलुगूमध्ये २८ आणि उर्दूमध्ये ३ निकाल उपलब्ध आहेत. ‘ई-एस्.सी.आर्.’ प्रकल्पाचा भाग म्हणून हे निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर, त्याच्या भ्रमणभाष अ‍ॅपवर आणि ‘नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रिड’च्या  (एन्.जे.डी.सी.च्या) ‘जजमेंट पोर्टल’वर उपलब्ध आहेत. देशभरातील अधिवक्त्यांसाठी ही सेवा विनामूल्य उपलब्ध आहे. वापरकर्त्यांच्या सोयीच्या दृष्टीने ही शोध सुविधा उपलब्ध झाली आहे.